Bhagwant Khuba: कोळसा, तेल, नैसर्गिक वायू हे आपले पारंपरिक इंधन साठे दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. अशातच वीज निर्मितीसाठी भारत या पारंपरिक स्त्रोतांसोबतच सौर आणि इतर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांकडे वळताना दिसत आहे. अशातच विजेची वाढती मागणी लक्षात घेता ऊर्जा क्षेत्रात परिवर्तनाची गरज असल्याचं, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा म्हणाले आहेत. खुबा म्हणाले की, यामुळे 2050 पर्यंत 32 लाख नोकऱ्या निर्माण होण्यास मदत होईल. भारतीय उद्योग परिसंघ (CII) ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात खुबा म्हणाले की, “विजेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातील बदल हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते.


ते म्हणाले आहेत की, ऊर्जा क्षेत्रातील बदलांमुळे आपल्या देशाची आयातित इंधनावरील अवलंबित्व कमी होईल. यामुळे व्यापार संतुलनात सुधारणा होईल आणि हरितगृह वायू (GHG) उत्सर्जन कमी होईल. आर्थिक विकास, वाढती समृद्धी, शहरीकरणाचा वाढता दर आणि वाढता दरडोई ऊर्जा वापर, यामुळे देशातील ऊर्जेची मागणी वाढत असल्याचे भगवंत खुबा म्हणाले आहेत. खुबा म्हणाले, “कोरोना संकटानंतर जागतिक अर्थव्यवस्था सावरत आहे. मी तुम्हा सर्वांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करतो.''


या कार्यक्रमात बोलताना भारतातील ब्राझीलचे राजदूत आंद्रे अरान्हा कोरियो डो लोगो म्हणाले की, आम्ही भारताकडे सौर पॅनेलचा संभाव्य उत्पादन निर्यात भागीदार म्हणून पाहतो. 52,000 मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करण्याचा ब्राझीलचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ब्राझीलच्या इथेनॉल इंधनाच्या अनुभवाचा भारत फायदा घेऊ शकतो आणि आपल्या उद्योगाला चालना देऊ शकतो.


हे देखीला वाचा-