Jammu Kashmir: जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu Kashmir) भारत-पाकिस्तानच्या (LAC) सीमेलगत असलेल्या कुपवाडा या गावात भारतीय लष्करामध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पोलिसांनी आणि लष्कराच्या जवानांनी एकत्रितपणे ही मोहिम राबवली. लष्कराच्या जवानांना (Indian Army) आणि जम्मू काश्मीरच्या पोलिसांना (Kashmir Police) गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी ही मोहिम राबण्यास सुरुवात केली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांकडून देखील गोळीबार करण्यात आला. परंतु सुदैवाने लष्कराच्या कोणत्याही जवानाला यामध्ये दुखापत झाली नाही. 


पुंछमधील दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला


गुरुवारी (15 जून) रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा हा कट हाणून पाडला. तसेच लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर छापेमारी करुन दारुगोळा देखील जप्त केला आहे.  लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शोध मोहिमेदरम्यान ही छापेमारी करण्यात आली आहे. तसेच यामध्ये पाकिस्तानमध्ये बनवलेल्या औषधांचाही समावेश आहे.  


जम्मू आणि काश्मीरच्या सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी म्हटलं की, 'भारतीय सैन्याने आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी एकत्रितपणे 14 आणि 15 जूनच्या मध्यरात्री कृष्णा घाटी परिसरात दहशावाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.'  


या भागात देखील करण्यात आली कारवाई


लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर दहशतवाद्यांच्या तळावर देखील छापेमारी करण्यात आली. यामध्ये एक AK-47 रायफल, 438 काडतुसं,  दोन पिस्तूल आणि सहा ग्रेनेड, याशिवाय काही कपडे आणि औषधं मिळाली आहेत.  लेफ्टनंट कर्नल आनंद यांनी म्हटले की, 'तात्काळ करण्यात आलेल्या या कारवाईमुळे दहशतवाद्यांचा कट हाणून पाडण्यास आम्हाला यश आले आहे. दहशतवाद्यांच्या या कटामुळे पुंछ जिल्ह्यामधील शांतता बिघडण्याची शक्यता होती.' 


तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. परंतु या गोष्टीचा संशय येताच लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा सीमेपलीकडून दशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचा संशय लष्कराच्या जवानांना आला. मात्र, दाट धुक्याचा आणि अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी  शस्त्रास्त्रे सोडून तेथून पळ काढला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


शत्रूची झोप उडवणारं घातक ड्रोन खरेदी करणार भारत, अमेरिकेसोबतच्या करारासाठी DACकडून प्रस्ताव मंजूर