MQ-9 Reaper Armed Drone Deal: संरक्षण अधिग्रहण परिषदेनं (DAC) गुरुवारी (15 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अमेरिकन कंपनी जनरल अॅटोमिक्सकडून प्रीडेटर MQ-9B रीपर (MQ-9B Reaper) ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. भारत अमेरिकेकडून असं तब्बल 30 ड्रोन खरेदी करणार आहे. भारतीय नौदलाकडे हे दोन ड्रोन आधीच भाड्यानं आहेत. MQ-9B रीपर हे जगातील सर्वात घातक ड्रोन मानलं जातं.
ड्रोन खरेदीचा करार सुमारे तीन अब्ज डॉलर्सचा : सूत्र
वृत्तसंस्था पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं माहिती दिली की, चीनच्या सीमेवर सशस्त्र दलांची देखरेख करण्यासाठी तेवढ्या सक्षम उपकरणांची गरज आहे. त्यासाठी अमेरिकेकडून MQ-9B प्रीडेटर ड्रोन खरेदी केले जाणार आहेत. सुमारे तीन अब्ज डॉलर्सचा हा खरेदी करार असून, त्यासाठी संरक्षण मंत्रालयानं हिरवा कंदील दिला आहे.
मोदी-बायडन भेटीनंतर घोषणा होण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन पुढील आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये भेटणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर ड्रोन खरेदी करण्यासंदर्भातील कराराची घोषणा होण्याची शक्यता आहे. डीएसीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ड्रोन खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे.
हे ड्रोन सागरी निगराणीसह अनेक गोष्टींसाठी सक्षम
MQ-9B रीपर्स ड्रोनचे दोन प्रकार आहेत, जे स्काय गार्डियन आणि सी गार्डियन म्हणून ओळखले जातात. भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांसाठी 'सी गार्डियन' प्रकार खरेदी करण्यात आला आहे. हे ड्रोन सागरी देखरेखीसाठी वापरले जाऊ शकतात, तसेच पाणबुडीविरोधी युद्धासह विविध भूमिका बजावू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेकडून खरेदी करण्यात येणार्या 30 ड्रोनपैकी 14 नौदलाला, तर हवाई दल आणि लष्कराला प्रत्येकी आठ ड्रोन मिळू शकतात.
अमेरिकेकडून ड्रोन खरेदी करण्याची इच्छा भारत पूर्वीपासूनच दाखवत आला आहे. मात्र, काही अडचणींमुळे ही ड्रोन डील लांबत गेली आहे. आता पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणारच आहेत, तर त्यापूर्वी ही डील फायनल व्हावी यासाठी अमेरिकेचं परराष्ट्र खातं, पेंटागॉन आणि बायडेन सरकार हे मिळून प्रयत्न करत आहेत. अशातच पंतप्रधान मोदी 22 जून रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे आता मोदींच्या दौऱ्यावेळीच ड्रोन डील होण्याची शक्यता आहे.
MQ-9 Reaper Armed ड्रोनची वैशिट्य
जनरल अॅटोमिक्सने बनवलेलं MQ9 हे ड्रोन विशेषतः सागरी युद्धांसाठी वापरलं जातं. क्वाड देशांपैकी भारत वगळता सर्वांकडे हे ड्रोन आहेत. या ड्रोनचं वैशिष्ट म्हणजे, केवळ सर्विलियन्स नाही तर अटॅक करण्यासाठीही या ड्रोनचा वापर करता येतो. सॅटेलाईटनं ऑपरेट करता येणारं हे ड्रोन 45 हजार फूट उंच उडू शकतं. एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 35 तास हे ड्रोन वापरता येऊ शकतं. यासोबतच यात रेडार आणि अत्याधुनिक सेन्सर लावण्यात आले आहेत. या ड्रोनमध्ये मिसाईल आणि गनपावडर ठेवता येते.