Prashant Kishor Congress : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोरही उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. प्रशांत किशोर यांनी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही सूचना दिल्या आहेत. काही राज्यात काँग्रेस करत असलेल्या आघाडीबाबत प्रशांत किशोर यांनीही आपले मत व्यक्त केले. 


कमकुवत असलेल्या राज्यात आघाडी करण्याचा सल्ला


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींसोबत झालेल्या या बैठकीत काँग्रेस कमकुवत असलेल्या राज्यात इतर पक्षांसोबत आघाडी करण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला आहे. मात्र, बिहारबाबत प्रशांत किशोर यांनी आपले वेगळे मत दिले आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलासोबत युती केल्याने काँग्रेसला फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटले. राजदसोबतच्या युतीमुळे यादवांशिवाय इतर मते काँग्रेसच्या पारड्यात पडत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले. 


इतकंच नव्हे तर, भाजपला मिळणारे यश हे धार्मिक ध्रुवीकरणामुळे मिळत असल्याचा तर्कदेखील प्रशांत किशोर यांनी खोडून काढला. भाजपच्या विजयाचे गमक हे धार्मिक ध्रुवीकरण नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत किशोर यांच्या मताशी राहुल गांधीदेखील सहमत झाल्याचे दिसून आले. प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशमध्ये स्वतंत्रपणे लढण्याचा, बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्र सारख्या राज्यात आघाडी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. 


प्रशांत किशोर यांच्या एन्ट्रीनंतर सर्वपक्षीय नेत्यांचे आवाहन 


काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत दुपारी प्रशांत किशोर यांनी हजेरी लावली. तर, सायंकाळी धार्मिक सलोखा राखण्याचे आवाहन करणारे पत्र विरोधी पक्षांकडून संयुक्तपणे काढण्यात आले. यामध्ये सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीदेखील स्वाक्षरी होती. मागील काही महिन्यापासून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये फारसे सख्य असल्याचे दिसून येत नव्हते. त्या पार्श्वभूमीवर हे पत्र महत्त्वाचे आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: