Gujarat Election 2022 : 2022 या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस  (Congress) मोठी रणनीती तयार करत आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळे आगामी गुजरात निवडणुकीसाठी पाटीदार नेते नरेश पटेल यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवण्यासाठी पक्षांतर्गत डावपेच आखण्याची तयारी सुरू असल्याचा दावा काँग्रेसच्या सूत्रांनी केला आहे. त्यामुळे नरेश पटेल लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor )  हे या योजनेचा महत्त्वाचा भाग आहेत.

  


2022 च्या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी आतापासूनच सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. नरेश पटेल हे गुजरातमधील पाटीदार समाजातील प्रभावशाली आणि प्रसिद्ध नाव आहे. गेल्या 28 वर्षांपासून गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता नाही. त्यामुळे या 28 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी काँग्रेस नरेश पटेल यांचा चेहरा देऊन निवडणूक लढवण्याची रणनीती आखत आहे. 


काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेश पटेल यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतली असून ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधींच्या गुजरात दौऱ्यादरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. सुरुवातीला त्यांच्याकडे निवडणूक प्रचार समितीची जबाबदारी दिली जाऊ शकते आणि निवडणूक जवळ आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार केले जाऊ शकते.


 नरेश पटेल हे पाटीदार समाजातील एक प्रसिद्ध नाव आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यांत ते अग्रेसर असताता. याबरोबरच गुजरातमधील इतर समाजांमध्येही त्यांची प्रतिमा चांगली असल्याचे मानले जात आहे. नरेश पटेल यांचा स्वत:चा मोठा व्यवसाय असून पाटीदार समाजातील प्रभावशाली लोकांमध्ये त्यांची पकड आहे. त्यामुळे ते केवळ राजकीयच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही खूप मजबूत आहेत. काँग्रेसच्या या रणनीतीमागे प्रशांत किशोर याचे नाव असल्याचे बोलले जात आहे. 
 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कोशोर यांना गुजरातमधील काँग्रेसच्या निवडणुकीत नरेश पटेल यांनी नेतृत्व करावे असे वाटत आहे. तर नरेश पटेल यांनाही गुजरातमधील प्रचार प्रशांत किशोर यांच्या देखरेखीखाली व्हावा अशी इच्छा आहे.  


महत्वाच्या बातम्या