Gujarat- Himachal Pradade Election Result VIP Seats: आज गुजरात (Gujarat Assembly Election)आणि हिमाचल प्रदेश (Gujarat Assembly Election) विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत काही महत्त्वांच्या जागांवरील निवडणूक ही प्रतिष्ठेची समजली जात आहे. एक्झिट पोलनुसार, गुजरातमध्ये भाजप सत्ता कायम राहणार असून हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकावरील काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई होणार आहे. 


>> हिमाचल प्रदेश 


1. सिराज 


हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर सहाव्यांदा सिराज मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री जयराम ठाकूर या मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री जयराम यांची पुन्हा काँग्रेसचे चेतराम ठाकूर यांच्याशी लढत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत जयराम ठाकूर यांनी काँग्रेसचे चेतराम ठाकूर यांचा 11,254 मतांच्या फरकाने पराभव केला होता.


2. शिमला 


हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह हे शिमला ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.  मागील निवडणुकीत विक्रमादित्य सिंह विजयी झाले. तर, भाजपने येरवी मेहता यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास विक्रमादित्य सिंह हे मुख्यमंत्री होऊ शकतात. 


3. हरोली 


काँग्रेसचे नेते मुकेश अग्निहोत्री हे सध्या हिमाचल प्रदेशमधील हरोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. या निवडणुकीत ते विजयाची हॅट्रिक साधणार का, हे पाहावे लागणार आहे. 


4. थिओग 


थिओग विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPIM) राकेश सिंघा आहेत. यावेळी त्यांना काँग्रेस आणि भाजपच नव्हे तर आम आदमी पक्षाचेही  आव्हान आहे. या मतदारसंघात सीपीआयएम, भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत आहे.  


5. डलहौसी 


हिमाचल प्रदेशातील डलहौसी विधानसभा जागेवर काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. डलहौसी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आशा कुमारी या सहा वेळा आमदार झाल्या आहेत. आशा कुमारी या छत्तीसगड सरकारचे आरोग्य मंत्री टीएस सिंह यांची बहीण आहे. यावेळी त्यांना भाजपचे डीएस ठाकूर यांचे आव्हान आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत आशा कुमारी यांना 24 हजार 224 म्हणजेच 48.77 टक्के मते मिळाली होती.


6. फतेहपूर 


2017 च्या निवडणुकीत भाजपने कृपाल परमार यांना तिकीट दिले होते, परंतु त्यानंतर ते काँग्रेसचे माजी मंत्री सुजानसिंग पठानिया यांच्याकडून पराभूत झाले. यावेळी काँग्रेस पक्षाने दिवंगत काँग्रेस नेते सुजानसिंग पठानिया यांचे पुत्र भवानी सिंग पठानिया यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपने राकेश पठानिया यांच्यावर विश्वास दाखवला आहे. 2012 मध्ये काँग्रेसच्या सुजान सिंह यांनी भाजपच्या बलदेव ठाकूर यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भवानी सिंह पठानिया यांनी ही जागा जिंकली होती.


>> गुजरात


1. खंभलिया 


आम आदमी पक्षाने खंभलिया मतदारसंघातून इसुदान गढवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची थेट लढत काँग्रेसचे विक्रम मदाम आणि भाजपचे दिग्गज मुलू बेरा यांच्याशी होईल. या जागेच्या जातीय समीकरणदेखील परिणामकारक ठरले आहे. या ठिकाणी अहिरांचे वर्चस्व राहिले असून प्रत्येक वेळी अहिर समाजाचा नेता येथे आमदार होतो. त्यामुळे इसुदान गढवी यांच्यासाठी चुरशीची निवडणूक असणार आहे.


2. घाटलोडिया 


अहमदाबाद जिल्ह्यातील घाटलोडिया ही जागा भाजपचा बालेकिल्ला मानली जाते. गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे भूपेंद्र पटेल आणि आनंदीबेन पटेल यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी भाजपने भूपेंद्र पटेल यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या जागेवरून काँग्रेसने राज्यसभेच्या खासदार अमीबेन याज्ञिक यांना उमेदवारी दिली आहे.


3. सुरत 


सुरत विधानसभेत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप यांच्यात तिरंगी लढत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 77 जागा जिंकल्या आणि भाजपला 99 जागा जिंकण्यास यश मिळाले होते. याशिवाय येथील महापालिका निवडणुकीत 'आप'चे 27 उमेदवार नगरसेवक झाले आहेत. यामुळे 'आप' चमत्कार घडवणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. गुजरातमधील सुरत पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने अस्लम फिराजो भाई यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून अरविंद भाई राणा रिंगणात आहेत. तर दुसरीकडे आपकडून कांचन जरीवाला यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


4. विरमगाम


पाटीदार आंदोलनाचा प्रमुख नेता आणि काँग्रेसचा माजी नेते हार्दिक पटेल हे भाजपच्यावतीने निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा 75,000 मतांनी जिंकली होती. त्यामुळेच यावेळी काँग्रेसने लखाभाई भारवाड यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने कुवरजी ठाकोर यांना उमेदवारी दिली आहे. 


5. मोरबी 


मोरबी हा प्रदीर्घ काळापासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. वर्ष 1995 ते 2012 पर्यंत पक्षाने या जागा सातत्याने जिंकल्या आहेत. मोरबीमध्ये मोठ्या प्रमाणात पाटीदार लोकसंख्या आहे. त्यामुळे पाटीदार आंदोलनामुळे मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगली मते मिळाली होती.  भाजप उमेदवार कांती अमृतिया हा 3 हजार 419 मतांनी विजयी झाल्या होत्या. 


6. मणिनगर 


वर्ष 1990 पासून ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. ही जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 2002, 2007 आणि 2014 मध्ये त्यांनी ही जागा जिंकली होती. सध्या मणिनगरमधून भाजपचे सुरेश पटेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


7. गोध्रा 


गोध्रा विधानसभा क्षेत्रात 2 लाख 79 हजार मतदार असून त्यापैकी 72 हजार मतदार मुस्लिम आहेत. महापालिका निवडणुकीत एमआयएमने 7 जागांवर विजय मिळवला होता. गोध्रात विद्यमान आमदार भाजपचे सी. के. राऊलजी आहेत. 


8. उत्तर जामनगर


गुजरात निवडणुकीत या जागेची जोरदार चर्चा होत आहे. क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा यांना भाजपने तिकीट दिले आहे. रिवाबा यांची थेट लढत काँग्रेसच्या बिपेंद्रसिंग जडेजा यांच्याशी होणार आहे. काँग्रेस उमेदवार या रवींद्र जाडेजाची बहीण आहे. 


9. दानीलिम्दा 


गुजरातमधील दानीलिम्दा ही जागा काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अनुसूचित जातीची राखीव असलेल्या या जागेवरून काँग्रेसने यापूर्वी 2012 मध्ये 14,000 मतांच्या फरकाने, 2017 मध्ये 32,000 मतांच्या फरकाने ती जिंकली होती. या निवडणुकीत काँग्रेसला भाजप, आप आणि ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) यांच्या दावेदारांकडून आव्हान मिळू शकते.


10. द्वारका 


भाजपचे उमेदवार पबुभा मानेक यांनी 1990 पासून ही जागा कधीही गमावलेली नाही. त्यांनी 7 वेळा विधानसभा निवडणूक जागा जिंकली आहे. या जागेवर अहिर समाजाच्या लोकांची संख्या अधिक आहे. याशिवाय ओबीसी, सत्वरस समूह आणि मानेक समाजाचे लोकसंख्या प्रभावी आहे.