Eid Mubarak 2022 : ईद मुबारक! देशभरात नमाज अदा करत मुस्लिम बांधवांनी दिल्या शुभेच्छा, अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम ऐक्याची ईद

Eid Mubarak 2022 : देशभरात रमजान ईद साजरी, नमाज अदा करत मुस्लिम बांधवांनी दिल्या शुभेच्छा, अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम ऐक्याची ईद

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 May 2022 04:06 PM
mumbai : हाजीअली दर्ग्यात जाण्यासाठी मुस्लिम बांधवाची मोठी गर्दी,  दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम 

mumbai : हाजीअली दर्ग्यात जाण्यासाठी मुस्लिम बांधवाची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जंक्शनवर पोलिसांचा फौजफाटा वाढविण्यात आला आहे. 

Daund : दौंड आमदार राहुल कुल यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या
Daund : दौंड शहरातील ईदगाह मैदान परिसरात उपस्थित राहून आमदार राहुल कुल यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. आमदार राहुलदादा कुल मित्र मंडळाच्या वतीने काल रात्री अल्प दारात दुधाचे वाटप करण्यात आले तर आज ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था मस्जिद परिसरात करण्यात आली  आहे.  तर काल शिवजयंतीच्या निमित्ताने दौंड शहरात आयोजित करण्यात मिरवणुकीत सहभागी होऊन आमदार राहुल कुल यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर गाण्यावर ताल धरला. दौंड शहरात 2 वर्षानंतर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती मोहोत्सवात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दौंड शहरात दरवर्षी अक्षय्य तृतीया या दिवशी शिवजयंती साजरी होते.

 
Nanded : तब्बल दोन वर्षांनंतर प्रथमच नांदेडात त्याच उत्साहात आणि आनंदात नमाज पठण करूण "रमजान ईद" साजरी करण्यात आली
Nanded :  कोरोनानंतर तब्बल दोन वर्षे देशात कोणताच सण उत्साहत साजर करण्यात आला नव्हता. दरम्यान काल चंद्र दर्शन झाल्या नंतर देशभरातील मुस्लिमांचा सर्वात मोठा व पवित्र असा" ईद उल फित्र"अर्थात "रमजान ईद" ,आज दोन  वर्षांनंतर मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी होत आहे.मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना पूर्ण झाल्यानंतर,नमाज पठण करून ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात  येत आहे. आज सकाळी सार्वजनिक नमाज पठण करण्यासाठी नांदेड येथील ईदगाह मैदानावर शहरातील हजारो मुस्लिम बांधव जमले होते नमाज पठण झाल्यानंतर सर्वानी एकमेकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस बांधवाकडूनही मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी ईदगहा मैदानावर शुभेच्छा देण्यासाठी राजकीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान आज ईद सण साजरा होत असताना व राज्यातील परिस्थिती लक्षात घेता पोलिसांकडून शहरात व जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
Buldhana News : ईदच्या दिवशी गावातील हिंदूंनी मस्जित साठी दिला 'भोंगा' भेट

Buldhana News : बुलढाणा तालुक्यातील केळवद गावातील नागरिकांनी आज ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनोखं असं एकोप्याचं दर्शन देत गावातील मस्जितीला गावकाऱ्यांनी मिळून एक लाऊड स्पीकर भेट म्हणून देत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेचा असाही विरोध केला आहे. केळवद हे पाच हजार लोकसंख्येच गाव असून गावात तीन टक्के मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुण्या गोविंदानं आम्ही राहत असून गावात एक छोटीशी मशिद आहे. ज्यावर आजपर्यंत भोंगा नव्हता पण आज ईद च्या पर्वावर गावातील हिंदू नागरिकांनी मस्जितसाठी भोंगा खरेदी करून भेट म्हणून दिला आहे , यावेळी सरपंचासह गावातील नागरिकांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचा विरोध केला.

Hingoli News : मुस्लिम बांधवांनी ईद निमित्त केली सामुदायिक नमाज अदा

Hingoli News : आज रमजान ईद निमित्त हिंगोली शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी ईदनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पवित्र आशा रमजान महिन्यातील रोजे म्हणजेच उपवास संपल्यानंतर आणि मागील दोन वर्ष कोरोना काळातील निर्बंधांनंतर  आज नमाज अदा करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर एकत्र आले होते. रमजान ईदच्या या पवित्र दिवशी शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी हिंगोलीमधील ईदगाह मैदानावर एकत्र येत सामुदायिक नमाज पठण केले आहे. यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव उपस्थित होते. 

Eid 2022 : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये 440 पोलिसांचा बंदोबस्त
Eid 2022 : रमजान ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईद निमित्तानं कोठला स्टँड येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं. दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेऊन नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक न्यायालय  रस्ता मार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अहमदनगर पोलिसांनी 440 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला होता. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच ड्रोन कॅमेरानं देखील लक्ष ठेवण्यात आलं. राज्य राखीव पोलीस दल- 3 पथकं, ट्रॅकिंग फोर्स- 4 पथकं, सायबर पोलीस एक पथक पोलीस निरीक्षक 10 असा बंदोबस्त ठेवण्यात आला. धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आज रमजान ईद आणि अक्षय्य तृतीया हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यानं पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे.
Eid 2022 : देशाची शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहावी यासाठी परभणीत मुस्लीम बांधवांकडून विशेष प्रार्थना

Eid 2022 : महिनाभर कडक उपवास केल्यानंतर आज मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना संपला आणि आज सर्वत्र ईद साजरी करण्यात आली. परभणीत मोठ्या उत्साहात आणि शांततेत  ईद साजरी करण्यात आली. सकाळी नऊ वाजता ईद निमित्त मुस्लीम बांधवांकडून परभणी शहरातील ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांनी रमजान ईद निमित्त नमाज अदा केली. नमाज झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. देशाची शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहावी यासाठी मुस्लीम बांधवांकडून एक विशेष प्रार्थना ही यावेळी करण्यात आली.

Eid 2022 : मालेगांवात आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या उपस्थितीत लाखो मुस्लीम बांधवांकडून नमाज पठण

Eid 2022 : रमजान ईदचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. मालेगांव ही त्याला अपवाद नाही, मालेगांवमध्ये लाखोंच्या संख्येने मुस्लीम बांधवांनी नमाज पठण करुन ईद साजरी केली. मालेगांवमध्ये 14 ठिकाणी नमाज पठण करण्यात आले कोरोनाच्या दोन वर्षांच्या सावटानंतर आज सामुदायिक नमाज पठण झल्याने ईदचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. शहरातील पोलीस कवायत मैदानावर आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या उपस्थितीत लाखो मुस्लीम बांधवांकडून नमाज पठण होणार आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 1 हजारहून अधिक पोलीस कर्मचारी आणि 60 अधिकारी यांचा मालेगावात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे संपूर्ण शहरावर नजर ठेवण्यात येत आहे.

Eid 2022 : सोलापुरातील रंगभवन ईदगाह इथे सामूहिक नमाज पठण, ईदगाहमध्ये उपस्थित राहून पोलीस आयुक्तांकडून ईदच्या शुभेच्छा

Eid 2022 : आज देशभरात ईद उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी होत आहे. इस्लाम धर्मात प्रमुख असलेल्या सणांपैकी ईद उल फित्र आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात महिनाभर कडक असे उपवास केल्यानंतर मुस्लीम बांधव ईद साजरी करत असतात. ईदच्या निमित्ताने ठिकठिकाणी सामूहिक नमाज अदा करण्यात आली. सोलापुरातील रंगभवन ईदगाह या ठिकाणी देखील सामूहिक नमाज पठण करण्यात आली. यावेळी महिलांची संख्या देखील लक्षनीय होती. कोरोनामुळे मागील दोन वर्षात सर्वच सण-उत्सवावर निर्बंध होते. त्यामुळे ईदला देखील मागील दोन वर्षात सामूहिक नमाज पठण झाले नव्हते. यंदा निर्बंध कमी झाल्याने मुस्लीम बांधव मोठ्या उत्साहात ईद साजरी करत आहेत. एकमेकांची गळा भेट घेत शुभेच्छा दिल्या. दरम्यान सोलापूर शहर पोलीस आयुक्तालायाच्या वतीने मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. स्वतः पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी उपस्थित राहून ईदगाहमध्ये आलेल्या मुस्लीम बांधवांना गुलाब देत पोलिसांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, डॉ. प्रीती टिपरे या देखील उपस्थित होत्या.

Eid 2022 : दोन वर्षांनंतर सांगलीच्या ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण

Eid 2022 : रमजान ईद निमित्त सांगलीतील जुना बुधगाव रोडवरील ईदगाह मैदानावर मुस्लीम धर्मियांनी सामुदायिक नमाज पठण करत रमजान ईदची दुवा अदा केली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धनीने ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवानी सामुदायिक नमाज पठण केले. कोरोनामुळे मागील दोन वर्षांमध्ये या मैदानावर एकत्र येत मुस्लीम बांधवांना सामुदायिक नमाज पठण करता आले नव्हते. मात्र यंदाच्या रमजान ईदला कोरोनाचे निर्बध उठल्याने मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवानी ईदची दुवा अदा केली. नमाज अदा झाल्यानंतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी, संघटना पदाधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवाना गुलाबाची फुले देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान इदच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरासह जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

Eid 2022 : ईद निमित्त कल्याण दुर्गाडी किल्ला परिसरात हजारो मुस्लीम बांधवांचे नमाज पठण

Eid 2022 : : दोन वर्षानंतर देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कोरोना निर्बंधांमुळे ईद साजरी करण्यावर मर्यादा होत्या. ईद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात हजारो मुस्लिम बांधव एकत्रितपणे नमाज अदा करत असतात ,मात्र कोरोना निर्बंधामुळे दोन वर्ष या ठिकाणी मुस्लिम बांधवांना नमाज अदा करता आले नाहीत. यंदा कोरोनारुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे दुर्गाडी किल्ला परिसरात एकच उत्साह दिसून आला सकाळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या परिसरात जमा झाले होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय शांतता आणि अखंडता कायम राहावी, अशी प्रार्थना मुस्लीम बांधवांनी केली. त्यानंतर गळाभेट घेऊन लहान-मोठ्यांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. 

Eid 2022 : कुर्ला येथे हजारो मुस्लिम बांधव एकत्रित येऊन ईद नमाज पठण

 Eid 2022 :   आज मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा पवित्र सण आहे.या निम्मित कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात हजारो च्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यास एकत्र आले आहेत.गेले दोन वर्षे कोव्हिडं काळात एकत्रित येऊन नमाज पठण करण्यास बंदी होती.मात्र आता कोव्हीड चा प्रादुर्भाव कमी झाल्याने नियम शिथिल करण्यात आले आहे.या मुळे कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले आहेत.या मुळे काही वेळासाठी कुर्ला रेल्वे स्थानक रेल्वे परिसर चा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.

EID 2022 : आज देशभरात ईदचा उत्साह

EID 2022 : आज देशभर ईदचा सण आज साजरा केला जाणार आहे. ईद हा मुस्लिम बांधवांसाठी आनंदाचा सण आहे. मुस्लिम समाज 30 दिवस उपवाचा उपवास आज सोडून ईदचा सण साजरा करेल. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कठोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचा ईदच्या दिवशी अलर्ट राहिल. समाजकंटकांवर विशेष लक्ष ठेवण्यासह अनावश्यक गर्दी जमू देऊ नये यासाठी सर्व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आपापल्या जिल्ह्यात गस्त घालणार आहेत. 

पार्श्वभूमी

Eid-Ul-Fitr 2022 : देशासह जगभरात आज 'ईद-उल-फित्र' म्हणजेच 'रमजान ईद' साजरी केली जात आहे. हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे. ईद हा मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण मानला जातो. प्रत्येक मुस्लिम बांधव या खास दिवसाची वाट पाहत असतात. या दिवशी प्रत्येकजण आपल्या प्रियजनांना मिठी मारत त्यांना ईदच्या शुभेच्छा देतो. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर ईद-उल-फित्र साजरी केली जाते. रमजान महिन्यातील 30 दिवसांच्या उपवासानंतर (रोजा) ईदचा सण सर्वांमध्ये उत्साह घेऊन आला आहे. सर्व मशीद आणि ईदगाहमध्ये नमाज पठणासाठी लोक जमले आहेत. लोक एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देत आहेत. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर पहिल्यांदाच ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातं आहे. 


महिनाभराच्या रमजाननंतर अखेर सोमवारी ईदचा चंद्र दिसला. चंद्र दिसताच लोकांनी एकमेकांना मिठी मारली आणि अभिनंदन केलं. ईदचा चंद्र दिसल्याने सोमवारी शेवटची नमाज-ए-तरावीहची झाली. रमजानचा चंद्र दिसल्यानंतर मशिदींमध्ये सुरू झालेल्या तरावीहच्या विशेष नमाजाची सांगता झाली. मौलाना आणि मौलवी यांनी ईदचा सण शांततेत आणि प्रेमानं साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.


शव्वालचा चंद्र पाहून साजरी केली जाते ईद


ईद हा सण शव्वालचा चंद्र पाहून साजरा केला जातो. शव्वाल हे अरबी कॅलेंडरमधील एका महिन्याचे नाव आहे. हा महिना रमजान महिन्यानंतर येतो. शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फित्र साजरी केली जाते. ईद उल फित्रला मिठी ईद असेही म्हणतात. या दिवशी शेवया किंवा खीरसह अनेक गोड पदार्थ बनवले जातात. नंतर लोक एकमेकांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा देतात.


पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या. 'हा सण आपल्या समाजात एकता आणि बंधुभावाची भावना वाढवेल. मी सर्व देशवासियांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थना करतो. त्याचवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, ईद मुबारक! हा पवित्र सण प्रेमाचा भाव जागृत करणारा आणि आपणा सर्वांना बंधुभाव आणि सौहार्दाच्या बंधनात बांधून घेवो', असं ट्विट पंतप्रधानांनी केलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ईद-उल-फित्रच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. हा शुभ सोहळा आपल्या समाजात एकता आणि बंधुभावाची भावना वाढवेल. मी सर्व देशवासियांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थना करतो. त्याचवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, ईद मुबारक! हा पवित्र सण प्रेमाचा भाव जागृत करणारा आणि आपणा सर्वांना बंधुभाव आणि सौहार्दाच्या बंधनात बांधून घेवो.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.