ED Director Sanjay Mishra Controversy: ईडीचे (ED) प्रमुख संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांना तिसरी मुदतवाढ देण्याचा आदेश रद्द करताना देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) मंगळवारी केंद्र सरकारला मोठा दणका दिला. यावेळी न्यायालयानं म्हटलं की, ईडी प्रमुखांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देणं योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, ईडी संचालकांची सेवा तिसर्यांदा वाढवणं बेकायदेशीर आणि कायद्यानं अवैध आहे. मात्र, सरकारला दिलासा देत सर्वोच्च न्यायालयानं सेवा विस्ताराच्या नियमावलीतील दुरुस्ती योग्य असल्याचं मान्य केलं आहे.
दरम्यान, संजय मिश्रा 31 जुलै 2023 पर्यंत या पदावर राहतील, असं न्यायालयानं सांगितलं आहे. जेणेकरुन सुरळीत संक्रमण आणि सत्तेचं हस्तांतरण सुनिश्चित करता येईल, कारण FATF चा आगामी काळात आढावा घेतला जाणार आहे. या सेवा मुदतवाढीला विरोधक सातत्याने विरोध करत होते. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढीचा आदेश रद्द केल्यानंतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला चांगलेच घेरलं. दरम्यान, संजय मिश्रा यांनी साडेचार वर्ष ईडीचे संचालक म्हणून काम केलं. यादरम्यान त्यांनी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह एकूण 15 नेत्यांना तुरुंगात पाठवलं आहे.
कोण आहेत ईडी प्रमुख संजय कुमार मिश्रा?
संजय कुमार मिश्रा हे 1984 च्या बॅचचे IRS अधिकारी आहेत. संजय मिश्रा यांना आर्थिक तज्ज्ञ देखील म्हटलं जातं आणि इनकम टॅक्सच्या अनेक प्रकरणांच्या तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच त्यांची ईडी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ईडीचे प्रमुख बनण्यापूर्वी मिश्रा यांची दिल्लीतील इनकम टॅक्स विभागात मुख्य आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, संजय मिश्रा यांची पहिल्यांदा 19 नोव्हेंबर 2018 रोजी ED संचालक म्हणून दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये ते पद सोडणार होते, परंतु त्याआधी मे महिन्यात त्यांनी वयाची 60 वर्ष पूर्ण केली होती, म्हणजेच निवृत्तीच्या वयाचा टप्पा त्यांनी गाठला होता. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी केंद्र सरकारनं त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांच्या ऐवजी तीन वर्षांपर्यंत वाढवला होता.
यानंतर, केंद्र सरकारनं नोव्हेंबर 2021 मध्ये केंद्रीय दक्षता आयोग (CVC) कायदा तसेच, दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट (DSPE) कायद्यात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश आणला, ज्या अंतर्गत CBI आणि ED प्रमुखांना एक-एक वर्षांचे तीन सेवा विस्तार देण्यात आला. नंतर तो संसदेतही मंजूर झाला होता.
एकापाठोपाठ एक एक्सटेंशन
यानंतर नोव्हेंबर 2021 मध्येच संजय मिश्रा यांना दुसऱ्यांदा एक वर्षासाठी मुदतवाढ मिळाली. यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये केंद्र सरकारनं तिसऱ्यांदा संजय कुमार मिश्रा यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली. त्यानुसार 18 नोव्हेंबर 2023 रोजी संजय मिश्रा यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र त्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं मुदतवाढीचा आदेश रद्द केला.
संजय मिश्रा नेहमीच चर्चेत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय मिश्रा यांना केवळ राजकीय नेतेमंडळीच नाही, तर त्यांच्या विभागातही नेहमीच चर्चेत असतात. जिनिवा (Geneva) येथील एचएसबीसी बँकेत (HSBC Bank) खाती असलेल्या लोकांची नावं गोळा करण्यात संजय मिश्रा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या बँकेच्या खातेदारांनी अघोषित उत्पन्न लपवण्यासाठी परदेशी बँकांमध्ये पैसे जमा केल्याचा आरोप आहे.
इनकम टॅक्स विभागातही निभावलीये महत्त्वाची जबाबदारी
संजय मिश्रा यांनी इनकम टॅक्स विभागात कार्यरत असताना नॅशनल हेराल्ड प्रकरणाची चौकशी केली आहे. हे प्रकरण काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या अवतीभोवती फिरत होतं. याप्रकरणी ईडीकडून दोघांचीही चौकशीही झाली आहे. सध्या ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा NDTV च्या इनकम टॅक्स संदर्भातील प्रकरणाचा तपासही करत आहेत. त्यापैकी सर्वात हायप्रोफाईल केस म्हणजे नॅशनल हेराल्ड केस, ज्यामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची आतापर्यंत अनेकदा चौकशी करण्यात आली आहे.