IMD Rain Update : सध्या उत्तर भारतात पावसानं (Rain) हाहाकार केला आहे. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखडं, दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळं नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. 


हिमाचल प्रदेशमधील मनालीमध्ये अनेक पर्यटक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. आम्ही मनालीचा मार्ग खुला केला असून सुमारे 1000 वाहने निघाली आहेत. अडकलेल्या सर्वच पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली. मी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले. 


हिमाचल प्रदेशमध्ये सुमारे 4000 कोटींचे नुकसान 


हिमाचल प्रदेशमधील परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करुन मदत मागितली होती. परंतू, अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. सुमारे 4000 कोटींचे नुकसान झाले असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली. 


हवामान विभागाचा अंदाज काय?


उत्तराखंड आणि लगतच्या पश्चिम उत्तर प्रदेशात मंगळवारी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 12 जुलैपासून हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये पाऊस कमी होईल. दुसरीकडे, ईशान्य भारत आणि सिक्कीममध्ये खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे. 13 जुलैपर्यंत बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे आणि त्यानंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, 12 जुलैला म्हणजे अरुणाचल प्रदेश, आसम, सिक्किम, मेघालयमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  


यमुना नदीनं ओलांडली धोक्याची पातळी


दिल्लीत यमुना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यमुनेचे पाणी 206.32 मीटरच्या वर गेले आहे. यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने सखल भागात पुराचा धोकाही वाढला आहे. धोक्याची भीती लक्षात घेऊन लोकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस, बहुतांश ठिकाणी पावसाची दडी; आज विदर्भात यलो अलर्ट