Weather and Heat Wave Updates : सध्या देशातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. दिवसेंदिवस देशातील तापमानात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर भारतातही उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असलेल्या हिमाचल प्रदेशात सध्या उष्णतेतं मोठी वाढ झाली आहे. या ठिकाणी उष्णतेनं सर्व जुने रेकॉर्ड मोडले आहेत. हिमाचलमधील प्रमुख पर्यटन स्थळे असलेल्या शिमला, मनाली आणि धर्मशाला इथं मार्चच्या मध्यताच उष्णतेनं 12 वर्षांचा विक्रम मोडला आहे.


शिमला, मनाली आणि धर्मशाला ही हिमाचल प्रदेशमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी मार्च महिन्यातच उष्णतेनं यापूर्वीचं अनेक विक्रम मोडले आहेत. मैदानी भागातील उन्हापासून बचाव करण्यासाठी पर्यटक डोंगराकडे वळतात, मात्र मार्चमध्येच डोंगर देखील तापू लागले आहेत. 


धर्मशालामध्ये कमाल तापमान 32.2 अंश 


शिमला हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ संदीप कुमार शर्मा यांनी सांगितले की, यावेळी 17 मार्च रोजी शिमल्यात किमान तापमान 18 अंश सेल्सिअस होते. यापूर्वी 2010 मध्ये मार्चमध्ये किमान तापमान 16.5 अंश होते. मार्च महिन्यात मनालीमध्ये कमाल तापमान 27.5 वर पोहोचले. यापूर्वी 2004 मध्ये तापमान 27 अंश होते. तर धर्मशाला येथे कमाल तापमान 32.2 अंश नोंदवले गेले आहे. यापूर्वी 2010 मध्ये धर्मशाला येथे 31.6 अंश सेल्सिअस तापमान होते.


खराब हवामानामुळं काही भागात तापमानात फारशी वाढ झालेली नाही


आजकाल हिमाचल प्रदेशमध्ये तापमान सामान्यपेक्षा 6 ते 7 अंशांनी जास्त आहे. येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र, दोन दिवस काही भागात खराब हवामान असल्यानं तापमानात फारशी वाढ होणार नाही. शिमल्यात उष्मा वाढल्यानं पाण्याचे संकटही गडद होऊ लागले आहे. शिमल्यात पाण्याची टंचाई भासत आहे. उष्णता अशीच कायम राहिल्यास 2018 सारखी पर्यटन हंगामात पाण्याची टंचाई भासू शकते.


महत्त्वाच्या बातम्या: