Bank Strike In Maharashtra Mumbai India : आपली महत्वाची बँकांची काम असतील तर ती आज आणि उद्यापर्यंत उरकून घ्या. कारण परवा 26 मार्चपासून सलग 4 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. यामुळं सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 28 आणि 29 मार्च रोजी बॅंक कर्मचारी संघटनांचा संप आणि 26 आणि 27 मार्च रोजी बॅंकांना सुट्टी असल्यानं मोठा परिणाम होणार आहे.
ऐन मार्च महिन्यात संप होत असल्यानं सामान्य ग्राहकांसोबतच बॅंकिंग क्षेत्राला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. या संपामुळं स्टेट बॅंक आॅफ इंडिया (SBI) आणि इंडियन ओव्हरसीज बॅंक सोडता इतर सर्व बॅंकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
5 लाखांहून अधिक बॅंक कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी होणार असल्याचा संघटनांचा दावा आहे.
काय आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या...
बॅंकांच्या खासगीकरणाला विरोध, बॅंकांमधील कंत्राटीकरण, बॅंकेतील कामाचे आऊटसोर्सिंग आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मुद्द्यांवर बॅंक कर्मचारी संपाच्या तयारीत आहेत. सोबतच लोकसभेतील अधिवेशनात बॅंकिंग कायदा दुरुस्ती विधेयक मांडल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील संघटनांनी दिला आहे. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन, एआयबीओए, बेफी आणि महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन संपात सहभागी होणार आहे. सहकारी बॅंका, काही विदेशी बॅंका, जुन्या खासगी बॅंका, ग्रामीण बॅंकामधील कर्मचारी देखील संपात सहभागी होणार असल्याचा संघटनांचा दावा आहे.
खासगीकरणाच्या विरोधात आंदोलनाची घोषणा
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (एआईबीओसी) ने सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. हा संप देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बँकिंग अधिकाराचे हनन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातून बँक उद्योग गेल्यास याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना अधिक बसणार आहे. या देशातील सामान्य नागरिकांचे बँकिंग अधिकार आणि त्याद्वारे आर्थिक विकासासाठी मिळणाऱ्या सोयी सवलती वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे
इतर महत्वाच्या बातम्या