नवी दिल्ली : सोमवारच्या रात्री उत्तर भारत भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला. दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. सुदैवाची बाब म्हणजे कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.


भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल असल्याची नोंद आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये जमिनीपासून 33 किलोमीटर खाली भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे घाबरलेल्या सामान्य नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.

भूकंपाच्या धक्क्यांमुळे पंतप्रधान कार्यालयापासून गृहमंत्रालयापर्यंत आणि उत्तर भारतातील राज्य सरकारांपासून एनडीआरएफच्या टीमपर्यंत सर्वच जण सक्रिय झाले. एनडीआरएफच्या टीमला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

https://twitter.com/narendramodi/status/828668367200464897

हिमालयाच्या क्षेत्रात येणाऱ्या उत्तराखंड राज्यात कायमच भूकंपाचा धोका आहे. भूकंपानंतर बसणाऱ्या धक्क्यांच्या भीतीनेही लोकांच्या मनात घर केलं आहे. मात्र केंद्र सरकारने जनतेला शांतता राखण्याचं आणि घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे.