नवी दिल्ली : आसाममध्ये बुधवारी 6.4 रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा हादरा बसल्याची माहिती समोर येत आहे. आसाममध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता संपूर्ण आसाम, उत्तर बंगाल आणि उत्तर पूर्व भारतातील काही भागांत जाणवली. सध्याच्या घडीला मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये जिवीत आणि मृत हानी झाल्याची कोणतीही नोंद अद्याप नाही.
National Centre of Seismology च्या माहितीनुसार आसाममधील तेजपूर हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तेजपूरपासून 43 किलोमीटर पश्चिमेला भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती National Centre of Seismologyनं दिली आहे.
European Mediterranean Seismological Centre (EMSC) नं दिलेल्या माहितीनुसार भूगर्भात 10 किमी खोलीवर म्हणजेच 6.21 मैलांवर हा भूकंप आला होता. आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनीही ट्विट करत या शक्तिशाली भूकंपाची माहिती दिली. तर, गुवाहाटीमधील काही नागरिकांनी सोशल मीडियाचा आधार घेत या क्षणाचे काही व्हिडीओ पोस्ट केले.
आसाममध्ये आलेल्या या भूकंपाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असून, यामध्ये काही दुकानांच्या भिंती, घराच्या खिडक्या कोसळतानाची दृश्य दिसत आहेत.