अगरतळा :  कोरोना काळात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अतोनात प्रयत्न करत हा संसर्ग नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांत असताना नागरिकांचा बेजबाबदारपणा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. सरतेशेवटी प्रशासनालाच काही कठोर पावलं उचलावी लागत आहेत. सध्या असंच चित्र पाहायला मिळालं आहे त्रिपुरामध्ये. 


त्रिपुरा पश्चिमचे जिल्हाधिकारी डॉ. शैलेश कुमार यादव यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह रात्रीच्या संचारबंदीचे नियम लागू असतानाही विवाहसोहळ्यांचे आयोजन करणाऱ्या दोन ठिकाणांवर धाड टाकली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असतानाच वारंवार ताकिद देऊनही नियमांची पायमल्ली होण्याचं सत्र सुरुच असल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला. 


Corona Vaccine Registration : 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य; कशी कराल नोंदणी?


सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी ही कारवाई करण्यात आली. ज्यावेळी यादव यांनी विवाहस्थळांना भेट देत भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 144 मधील नियमांची पायमल्ली होत असल्याचं कारण पुढे करत ही कारवाई केली. आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार धाड टाकण्यात आलेल्या दोन्ही ठिकाणांपैकी एका ठिकाणहून 31 जणांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये 19 महिलांचाही समावेश आहे. सदर समारंभांची माहिती मिळताच संचारबंदीच्या नियमांचं पालन होत नसल्याचा मुद्दा अधोरेखित करत यादव यांनी या कार्यक्रमांवर धाड टाकली ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिला, पुरुष आणि लहान मुलं एकत्र आली होती. 






सोशल मीडियावर सध्या या कारवाईचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जिथं जिल्हाधिकारी वराला आणि ब्राह्मणाला पोलिसांना ताब्यात घेण्याचे आदेश देताना दिसत आहेत. 'ही सर्व मंडळी उच्चशिक्षित आहेत. तरीपण ते नियमांचं पालन करत नाहीत. ही तीच माणसं आहेत जी दुसऱ्या बाजूला सरकार काहीच करत नाही म्हणून आरोप करत असतात. सदर प्रकरणाची कल्पना असूनही कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश मी दिले आहेत', असं यादव घटनास्थळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.