Election Results 2024

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

PM Modi on coronavirus : कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उच्चस्तरिय बैठका; देशातील ऑक्सिजन स्थितीचा घेतला आढावा

एबीपी माझा वेब टीम Updated at: 27 Apr 2021 10:50 PM (IST)

वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि कोविड व्यवस्थापन विषयक अधिकारप्राप्त गटाने पंतप्रधानांना, खाटा आणि अतिदक्षता विभागांची उपलब्धता वाढवण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच संसर्गाची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) सुरु असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली.

Prime_Minister_Narendra_Modi

NEXT PREV

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. देशातील ऑक्सिजनची उपलब्धता, औषधे, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा इत्यादींचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. देशात ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा वाढवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली. 


राज्यांना वितरित केल्या जात असलेल्या ऑक्सिजनमध्ये होत असलेल्या वाढीची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. देशातील द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन ऑगस्ट 2020 मध्ये दररोज 5700 मेट्रिक टन इतके होत असे, ते 25 एप्रिल रोजी 8922 मेट्रिक टन इतके झाले असल्याविषयी यावेळी चर्चा झाली. द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचे देशान्तर्गत उत्पादन एप्रिल 2021 अखेरपर्यंत प्रतिदिनी 9250 मेट्रिक टनापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.


या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत म्हटलं की,



तीन बैठकीत आम्ही ऑक्सिजन स्थिती आणि त्याची क्षमता वाढविण्याविषयी चर्चा केली. अधिक वैद्यकीय पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत. तसेच कोरोना प्रोटोकॉलविषयी जागरूकता वाढवण्यावर भर दिला जात आहे. -






पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्यासाठी राज्य सरकारांशी समन्वयाने काम करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिकाऱ्यांना दिल्या. तर असे प्रकल्प उभारण्यासाठी राज्यांनाही प्रोत्साहन देत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली. ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वेसेवेची तसेच भारतीय हवाई दलाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या उड्डाणांची त्यांना माहिती देण्यात आली.


वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि कोविड व्यवस्थापन विषयक अधिकारप्राप्त गटाने पंतप्रधानांना, खाटा आणि अतिदक्षता विभागांची उपलब्धता वाढवण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच संसर्गाची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) सुरु असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली. कोविड व्यवस्थापनासाठी विकसित केलेल्या विशिष्ट मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी राज्यांतील संबंधित संस्थांनी करण्याची खबरदारी घेण्यावर पंतप्रधानांनी भर दिला.


 

Published at: 27 Apr 2021 10:39 PM (IST)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.