Earthquake गुरुवारी रात्रीच्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. भुकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर येत सुरक्षितेचे काही उपाय अवलंबले. मुख्य म्हणजे गुरुवारी फक्त दिल्ली एनसीआर भागच नव्हे, तर नोएडा, गाजियाबाद या भागांसह मणिपूर आणि राजस्थानमध्येही भूकंप जाणवल्याचं म्हटलं गेलं.


दिल्ली एनसीआरमध्ये रात्री भूकंप


रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दिल्ली एनसीआर भागात भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर आले. सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता कळू शकली नाही. पण, त्यानंतर हाती आलेल्या माहितीनुसार 4.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप असल्याचं म्हटलं गेलं. भूकंपाचं केंद्र गुरुग्रामपासून 48 किलोमीटर दूर दक्षिण पश्चिम दिशेला असल्याचं सांगण्यात येत आहे.


सीकरही हादरलं


राजस्थानमधील सीकरमध्येही गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार य भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल असल्याचं सांगण्यात आलं. यासंबंधीच्या वृत्ताला भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (MoES) राष्ट्रीय विज्ञान केंद्रानं (NCS)नंही दुजोरा दिला.


मणिपूरमध्येही जाणवला भूकंप


नॅशनल सेंटर ऑफ सिस्म़ोलॉजीनुसार गुरुवरी रात्री मणिपूरनजीक असणाऱ्या Moirang मध्ये 3.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आल्याची माहिती समोर येत आहे. या भूकंपाचं केंद्र Moirang  मणिपूरपासून 38 किलोमीटर दक्षिणेकडे होतं. भारतीय वेळेनुसार हा भूकंप रात्री 10.03 वाजता आला.





दिल्ली ठरतेय सर्वाधिक संवेदनशील क्षेत्र


मागील काही दिवसांपासून दिल्लीत सातत्यानं बसणाऱे भूकंपाचे हादरे पाहता दिल्लीतील बरंच क्षेत्र संवेदनशील असल्याची बाब समोर येत आहे. यानजीकच्या भागाला झोन 4 मध्ये गणलं जात आहे. जिथं 7.9 रिश्टर स्केलचा भूकंपही येऊ शकतो. दिल्लीत भूकंप येऊ शकणाऱ्या भागांमध्ये यमुना तीराजवळील काही भाग, पूर्व दिल्ली, शाहदरा, मयूर विहार, लक्ष्मी नगर, गुरुग्राम, रेवाडीचा समावेश आहे.


भारतात होणाऱ्या भूकंपास कारण की...


भारतीय भूखंडावर अनेकदा भूकंपाचे जबर हादरे बसले आहेत. 2001 मध्ये गुजरातच्या कच्छ येथे झालेल्या एका विनाशकारी भूकंपात हजारोच्या संख्येनं नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारत प्रति वर्ष जवळपास 47 मिलीमीटरच्या गतीनं आशियावर आदळत आहे. टेक्टॉनिक प्लेट आदळत असल्यामुळंच भारतात सातत्यानं भूकंपाचे हादरे बसत असतात. असं असलं तरीही भूजल पातळीमुळं  टेक्टॉनिक प्लेटमधील गतीचा वेग मंदावला आहे.


चार क्षेत्रांमध्ये भारतातील भूकंपप्रवण क्षेत्रांची विभागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये झोन 5, झोन 4, झोन 3 आणि झोन 2चा समावेश आहे.


झोन 5 मध्ये संपूर्ण पूर्वोत्तर भारत, जम्मू-कश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमधील कच्छ चे रण, उत्तर बिहार मधील काही भाग आणि अंदमान निकोबार बेट समूहांचा समावेश आहे. इथं सातत्यानं भूकंपाचे हादरे जाणवतात. तर, झोन 4 मध्ये दिल्ली, सिक्किम, उत्तर प्रदेश मधील उत्तर भाग, बिहार आणि पश्चिम बंगालसह महाराष्ट्राचा काही भाग तसंच राजस्थानचा समावेश आहे.


झोन 3 मध्ये केरळ, गोवा, लक्षद्वीप द्वीपसमूह, उत्तर प्रदेश मधील उर्वरित भाग, गुजरात आणि पश्चिम बंगाल, पंजाबचा काही भाग मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढ़, महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकचा समावेश होतो. तर, झोन 2 मध्ये भूकंपाच्या दृष्टीनं सर्वात कमी सक्रिय भागाची नोंद करण्यात येते.