नवी दिल्ली : डायरेक्ट टॅक्स कोडवर स्थापन केलेल्या टास्क फोर्सने आर्थिक मंत्रालयाला सोपवलेल्या अहवालात करप्रणालीत फेररचना करण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या पॅनलने सरकारला पाच लाखांपासून 20 लाखांपर्यंत कमाई करणाऱ्यांच्या कराच्या दरात कपात करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सध्या असलेला 5 टक्के, 20 टक्के आणि 30 टक्के टॅक्स स्लॅब हा 5 टक्के, 10 टक्के आणि 20 टक्के करावा, असं अहवालात म्हटलं आहे.


सध्या 10 लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर 30 टक्के कर लागतो, त्याऐवजी 10 ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 30 ऐवजी 20 टक्के कर लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. पॅनलने 20 लाखांपासून 2 कोटी रुपयांची वार्षिक कमावणाऱ्यांना 30 टक्के तर अतिश्रीमंत म्हणजेच वार्षिक 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या करदात्यांवर 35 टक्के आयकराची शिफारस केली आहे.

आयकर कायद्यात सुधारणा करण्यासाठी बदल

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे सदस्य अखिलेश रंजन यांच्या नेतृत्त्वाखालील टार्स फोर्सने 19 ऑगस्ट रोजी आपला अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सोपवला होता. परंतु हा अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही. टास्क फोर्सची स्थापना 58 वर्ष जुन्या आयकर कायद्यात बदल करण्यासाठी केले आहेत. याचा उद्देश आयकरच्या तरतुदी सोप्या बनवणं आणि करदायित्वात सुधारणा करणं हाच आहे.

कसा होणार फायदा?

सरकारने पॅनलच्या शिफारशी मंजूर केल्या तर वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असणाऱ्या करदात्यांना 20 ऐवजी 10 टक्के आयकर भरावा लागेल. या पॅनलने 10 लाखांवर वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्के कर लावण्याची शिफारस केली आहे.

समजा तुमचं उत्पन्न 10 लाख असेल, तर पहिल्या अडीच लाख उत्पन्न करमुक्त असेल. त्यानंतर अडीच ते पाच लाखांसाठी तुम्हाला पाच टक्के कर द्यावा लागेल. पण तुम्ही योग्य गुंतवणूक केली तर हा पाच टक्के कर सुद्धा माफ होईल. म्हणजेच तुमचं पहिल्या पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. त्यानंतरच्या पाच ते दहा लाखापर्यंतच्या स्लॅबसाठी दहा टक्के कर लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला 50 हजार रुपये कर भरावा लागेल.

सध्याचा टॅक्स स्लॅब कसा आहे?

अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न – करमुक्त

2.5 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 5 टक्के कर

5 ते 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 20 टक्के कर

10 ते 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न – 30 टक्के कर

शिफारशींनुसार नवा टॅक्स स्लॅब असा असेल!

अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न - करमुक्त

2.5 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न - 5 टक्के कर (परतावा मिळणार)

5 ते 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न - 10 टक्के कर

10 ते 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न - 20 टक्के कर

20 लाख ते 2 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न - 30 टक्के

2 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न - 35 टक्के