श्रीनगर : जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 हटल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यामधील वाकयुद्ध सुरुच आहे. राज्यपाल मलिक यांनी आता राहुल गांधींवर काश्मीरबाबत त्यांच्या भूमिकेवरुन हल्लाबोल केला आहे. मात्र टीका करताना राज्यपालांची जीभ घसरली. ते म्हणाले की, "जर राहुल गांधी कलम 370 चे समर्थक असतील तर लोक त्यांना बुटांनी मारतील."


काय म्हणाले सत्यपाल मलिक?
राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, "राहुल गांधी देशातील प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत, परंतु ते राजकीय नवशिक्याप्रमाणे वागले आहेत. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. गांधींनी हे करायला नको होतं. ज्यावेळी देशात निवडणूक होईल, त्यांच्याविरोधात काही बोलण्याची गरज नाही. केवळ एवढंच सांगितलं की राहुल गांधी 370 चे समर्थक आहेत, तो लोक बुटांनी मारतील."


काँग्रेसने काश्मीरवर भूमिक स्पष्ट केलेली नाही : सत्यपाल मलिक
कलम 370 हटवल्यानंतर आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत राज्यपाल सत्यपाल सिंह यांनी काँग्रेसला काश्मीरच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. राज्यपाल मलिक म्हणाले की, "ज्यावेळी त्यांच्या पक्षाचा नेता संसदेत काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राशी जोडत होता, त्यावेळी राहुल गांधींना बोलायला हवं होतं." लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्याकडे इशारा करताना मलिक म्हणाले की, "जर राहुल गांधी नेते होते, तर त्यांनी चौधरी यांना थांबवायला हवं होतं. काश्मीरच्या मुद्द्यावर पक्षाची ही भूमिका आहे, असं सांगायला हवं होतं. त्यांनी आतापर्यंत काश्मीरबाबात भूमिका स्पष्ट केलेली नाही."

राहुल गांधींची पाकिस्तानवर टीका
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानवर निशाणा साधला होता. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं सांगत, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान हिंसा भडकावण्याचं काम करत असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा आधार घेतल्याचं वृत्त होतं. त्यामुळे राहुल गांधींनी ट्वीट केल्याचं म्हटलं जात आहे.

काश्मीरमधील परिस्थितीवरुन सरकारवर हल्ला
दरम्यान, मागील आठवड्यात काश्मीरमधील परिस्थितीवरुन राहुल गांधी यांनी सरकारवर हल्ला करत, विरोधक आणि मीडियाला 'निष्ठुर प्रशासनाची' चव चाखायला मिळाल्याचं म्हटलं. राहुल गांधींचा इशारा हा त्यांच्या नेतृत्त्वाखालील विरोधकांच्या शिष्टमंडळाला काश्मीर खोऱ्यात जाण्यापासून रोखण्याकडे होता. तसंच या शिष्टमंडळासोबत गेलेल्या पत्रकारांनाही श्रीनगर विमातळाबाहेर जाण्यापासून मज्जाव घालण्यात आला होता.