मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) ड्रग्ज विकण्याच्या आरोपाखाली मालदिवच्या एका महिलेला कोचीन विमानतळावरून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या या महिलेचं नाव हे अमीनाथ रशिदा असं असून ती मालदिवमध्ये कपड्यांचा व्यापार करत असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.
मालदिवची ही महिला भारतात ओपीयम नावाच्या ड्रग्जचा व्यापार करायची. तिच्या विरोधात एनसीबीने लूक आऊट नोटीस जारी केली होती. ही महिला नेहमी भारतात यायची आणि या ठिकाणी ड्रग्जचा व्यापार करायची अशी माहिती एनसीबीला मिळाली होती.
डिसेंबर 2021 मध्ये एका कुरिअरच्या माध्यमातून भारतात ड्रग्ज येत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीवरून एनसीबीने संबंधित कुरिअरच्या कंपनीवर छापेमारी केली होती. त्या ठिकाणी एक बॅग आढळली होती, त्यावर कुणीही क्लेम केला नव्हता. त्या बॅगमध्ये 3.906 किलो ओपिअम ड्रग्ज आढळले होते. हे ड्रग्ज एका मायक्रोव्हेवमध्ये लपवण्यात आलं होतं.
एनसीबीच्या या छापेमारीनंतर अमीनाख रशिदा ही अंडरग्राऊंड झाली होती. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून त्या प्रकरणाचा कोणताही तपास करण्यात आला नसल्याने त्या महिलेने भारतात येण्याचं नियोजन केलं. कोचिन एअरपोर्टवर उतरताच गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिला अटक केली आणि एनसीबीला तशी माहिती दिली. त्यानंतर एनसीबीची एक टीम लागोलाग कोचिनला गेली आणि त्या महिलेला ताब्यात घेतलं.
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, रशिदा ही गेल्या अनेक वर्षांपासून ड्रग्जच्या व्यवसायात असून तिचा एक मुलगा ड्रग्ज पेडलर आहे. त्या मुलाला मालदिव पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Nawab Malik: नवाब मलिकांचा आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाविरोधात मोर्चा; जात पडताळणी करण्याचा अधिकार नसल्याचा दावा
- गांजाची राखण मूकबधिर व्यक्ती करायचा, महिला करायच्या विक्रीचं काम! पाच जणांना बेड्या, दिंडोशी पोलिसांची कारवाई
- Drugs Peddler ला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर 60 जणांचा हल्ला, पोलीस आणि जमावामध्ये धुमश्चक्री