DRDO Update : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने प्रथमच स्वायत्त फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरच्या (AFWTD)  उड्डाणाची यशस्वी चाचणी केली आहे. हे उड्डाण कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर करण्यात आले. अमेरिकेच्या B-2 बॉम्बरसारखे दिसणारे हे विमान पूर्णपणे स्वयंचलित असून त्याने स्वतः उड्डाण करून पॉइंट नेव्हिगेशन आणि लँडिंग केले. 


मानवरहित विमानांच्या विकासासाठी महत्त्वाचे तंत्रज्ञान सिद्ध करण्याच्या दृष्टीने हे उड्डाण एक मोठे यश आहे. देशाच्या संरक्षणासाठीही हे एक मोठे  पाऊल मानले जात आहे. हे विमान बंगळुरू स्थित एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एडीई) ने बनवले असून ते लहान टर्बोफॅन इंजिनसह उडते. विमानासाठी वापरण्यात येणारी एअरफ्रेम, अंडरकॅरेज आणि संपूर्ण फ्लाइट कंट्रोल आणि एव्हीओनिक्स सिस्टीम स्वदेशी आहे.


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीबद्दल डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.  "स्वायत्त विमानाच्या दिशेने ही मोठे पाऊल आहे. यामुळे महत्त्वाच्या लष्करी यंत्रणांच्या रूपाने 'आत्मनिर्भर भारता'चा मार्गही मोकळा होईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.  


मानवरहित विमान म्हणजेच यूएव्ही हे 21व्या शतकातील युद्धांचा अविभाज्य भाग आहेत. गेल्या दहा वर्षांत त्यांचा वापर वाढला आहे. गेल्या वर्षी आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील नागोर्नो-काराबाख संघर्षादरम्यान यूएव्हीला मान्यता मिळाली आहे. या विमानाच्या माध्यमातून ड्रोनने युद्धभूमीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले जाते. दहशतवाद्यांना देखील यूएव्ही म्हणजेच हे ड्रोन तंत्रज्ञान मिळत आहे. या ड्रोनच्या माध्यमातून ते हल्ला करतात.  




गेल्या वर्षी भारतीय लष्करप्रमुखांनी ड्रोन हल्ल्याचा धोका किती गंभीर आहे हे सांगितले होते. यासोबतच भारताच्या UAV ड्रोन ताफ्याला बळकटी देण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. देशात प्रभावी लढाऊ ड्रोन बनवण्यासाठी स्वदेशी प्रयत्न सुरू आहेत. चित्रदुर्गात घेण्यात आलेली चाचणी हे या प्रयत्नातील एक मोठे पाऊल आहे. याचा अर्थ भारतीय लष्कर तीन-चार वर्षांत स्वदेशी स्टिल्थ ड्रोनच्या मदतीने सीमांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात करेल. हे ड्रोड दहशतवादी तळांवर हल्ले करू शकतील. 


ड्रोन आणि यूएव्हीच्या बाबतीत भारत पाकिस्तानपेक्षा एक दशक मागे असून चीनपेक्षा आपण खूपच मागे आहोत. पाकिस्तान आणि चीन लढाऊ ड्रोनसह अनेक शस्त्रे विकसित करण्यासाठी एकमेकांना मदत करत आहेत. त्यामुळेच भारताने रहस्यमय स्टेल्थ ड्रोन घटक बनवला आहे. त्याच्या काही चाचण्या देखील झाल्या आहेत. 


भारतीय नौदलात सामील होण्यासाठी डेक-आधारित फायटर यूएव्ही प्रकार देखील शोधला जात आहे. 2025 ते 2026 या वर्षांच्या दरम्यान स्टेल्थ ड्रोनचा प्राणघातक प्रोटोटाइप लोकांसमोर येऊ शकतो. गेल्या वर्षीच भारतीय लष्कराने 75 लढाऊ ड्रोनसह स्वॉर्म ड्रोन तंत्रज्ञानाचे यशस्वीपणे प्रात्यक्षिक केले. म्हणजेच भारत ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्यास सक्षम आहे. 


या ड्रोनमधून क्षेपणास्त्रे, बॉम्ब आणि अचूक मार्गदर्शित शस्त्रे डागता येतात. हे स्वदेशी कावेरी इंजिनने चालते. सध्या अस्तित्वात असलेल्या प्रोटोटाइपची लांबी 4 मीटर आहे. विंगस्पॅन 5 मीटर आहे. हे जमिनीवरून 200 किमीच्या रेंजपर्यंत कमांड्स प्राप्त करू शकते.