Patna Bomb Blast : पुरावा म्हणून न्यायालयात आणलेल्या बॉम्बचा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. बिहारमधील पाटणा दिवाणी न्यायालयात शुक्रवारी हा बॉम्बस्फोट झाला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


पाटणा येथील कदमकुआन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मदन सिंह पुराव्यासाठी स्फोटके घेऊन न्यायालयात आले  होते. न्यायालयाच्या आवारातील टेबलावर  स्फोटके ठेवून  ते कागदपत्रांचे काम करत होते. त्याचवेळी अचानक स्फोट झाला. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत पोली, उपनिरीक्षकालाही किरकोळ दुखापत झाली आहे. स्फोटानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दिवाणी न्यायालयात पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  






मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा शहरातील मुलांच्या पटेल वसतिगृहातून नुकताच हा बॉम्ब जप्त करण्यात आला होता. हा बॉम्ब पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आला होता. न्यायालयात सुनावणी सुरू होण्यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक स्फोटके न्यायालयात आले. सोबत आणलेला बॉम्ब टेबलावर ठेवून इतर काहीतरी काम करत होते. यावेळी टेबलावर ठेवलेल्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला. या घटनेत पोलीस अधिकारीही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  


या घटने संदर्भात पाटणाचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी सांगितले की, कदमकुवा पोलीस ठाण्याचे एएसआय मदन सिंह यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. मात्र, या घटनेत अन्य कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पाटणा येथील पिरबहोर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर दिवाणी न्यायालय आहे. घटनेची माहिती मिळताच पीरबहोर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.