मुंबई : प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे. 25 जानेवारी 2017 पासून डॉ. भटकर नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु असतील.


डॉ. भटकर प्रभारी कुलगुरु पंकज मोहन यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. प्रभारी कुलगुरु पंकज मोहन आणि विद्यापीठाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी डॉ. भटकरांचं अभिनंदन करत त्यांना तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

डॉ. भटकरांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात नालंदा विद्यापीठ चांगलं काम करेल असा विश्वास विद्यापीठातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. डॉ भटकर यांनी आयआयटी दिल्लीत आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं.

विजय भटकरांचा परिचय

डॉ. विजय भटकर यांना आयटी लीडर म्हणून ओळखलं जातं.

भारताचा पहिलावहिल्या सुपर कॉम्प्यूटरचं डिझाईन भटकरांनी बनवलं आहे.

डॉ भटकर C-DAC चे संस्थापक कार्यकारी संचालक राहिले आहेत.

त्यांनी C-DAC, ER&DC, IITM-K, I2IT, ETH Research Lab, MKCL आणि India International Multiversity मध्ये भरीव योगदान दिलं आहे.

केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे डॉ भटकर सदस्य राहिले आहेत.

महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्यपदी डॉ. भटकरांनी भरीव योगदान दिलं आहे.

डॉ भटकरांचा पद्मश्रीनं गौरव

डॉ. विजय भटकर यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. तसंच भटकरांना संत ज्ञानेश्वर विश्व शांती पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय.