नवी दिल्ली :  देशात कोरोनाचं संकट वाढत असताना कोरोनावर लसीच्या संदर्भात महत्वाची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे की, सरकारकडून जुलै 2021 पर्यंत देशातील 25 कोटी जनतेला कोरोनाची लस दिली जाऊ शकते. आज संडे संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की,  2021 च्या जुलै महिन्यापर्यंत 25 कोटी लोकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे.  सरकारला कोरोना लसीचे 400 ते 500 कोटी डोस प्राप्त होतील आणि यातील जुलैपर्यंत 25 कोटी लोकांना लसीकरण पूर्ण होईल असं अनुमान आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.


केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, आपलं सरकार कोरोना आजारावर नियंत्रणासाठी 24 तास काम करत आहे. तसंच कोरोनाची लस आल्यानंतर त्याच्या वितरण प्रणालीसाठी देखील काम सुरु आहे. ते म्हणाले की, आमची प्राथमिकता आहे की देशातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस कशी दिली जाईल. कोरोना लसीच्या संदर्भात एक उच्चस्तरीय तज्ञांनी कमिटी देखील कार्यरत आहे, असं त्यांनी सांगितलं.





भारतात सध्या तीन लसींवर काम सुरु


जगभरात कोरोनाचा कहर अजूनही सुरुच आहे. अमेरिकेनंतर भारतात तो सर्वाधिक आहे. सोबतच कोरोनावर लस शोधण्यासाठी देखी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. भारतात देखील लसीवर काम सुरु आहे. देशात सध्या कोरोनावर तीन कंपन्यांच्या लसीचं काम सुरु आहे. यात  भारत बायोटेक-आयसीएमआरची कोवॅक्सिन(Covaxin), जायडस कॅडिला जायकोव-डी आणि ऑक्सफोर्डची कोरोना वॅक्सिन यांचा समावेश आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्‍सफर्ड यूनिव्हर्सिटीनं बनवलेल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु आहे. बाकीच्या दोन लसीची वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत.


कोरोनाबाधितांची संख्या 65 लाखांच्या वर


भारतात कोरोनाचा प्रसार वेगाने होत चालला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या 65 लाखांच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासात देशात नवीन 75 हजारांहून अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. दिलासादायक गोष्ट अशी की देशभरात मागील 24 तासात 82,260 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर 24 तासात 940 जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. देशभरात कोरोनामुळं मृत पावलेल्यांची संख्या 1 लाख एक हजार 782 एवढी झाली आहे.


कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत येईल, सीरमची शरद पवारांना माहिती


सीरमची कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत
कोरोनावर लस कधी येणार हा सवाल सध्या सर्वांच्याच मनात आहे. भारताचं आणि खासकरुन महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ते सीरम इन्सिट्यूटच्या कोरोना लसीकडे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची माहिती दिली होती. कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत येईल, अशी माहिती सीरमनं शरद पवारांना दिली आहे. त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, सीरम इन्स्टिट्युटमध्ये जाऊन प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन घेतले. माझ्यासोबत माझ्या स्टाफने देखील घेतले. मात्र हे कोरोनाचे औषधं नाही. सीरमची लस तयार व्हायला जानेवारीचा शेवट येईल असं मला त्यांनी सांगितलंय, असं शरद पवार म्हणाले.