बँकेतून वारंवार पैसे काढू नका, रिझर्व्ह बँकेचं नागरिकांना आवाहन
एबीपी माझा वेब टीम | 13 Nov 2016 12:09 PM (IST)
मुंबई : बँकेतून वारंवार पैसे काढू नका, त्याचप्रमाणे घरात जास्त रक्कम जमवून ठेवू नका, असं आवाहन रिझर्व्ह बँकेतर्फे करण्यात आलं आहे. बँका आणि एटीएमबाहेर सर्वसामान्य नागरिकांनी केलेली झुंबड पाहता आरबीआयतर्फे हे आवाहन करण्यात आलं आहे. आरबीआय आणि बँकांकडे पुरेशा प्रमाणात कमी (शंभर किंवा त्याहून कमी) रकमेच्या नोटाही उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांनी चिंता करु नये. बँकांच्या वारंवार फेऱ्या मारुन पैसे काढू नयेत. गरज असेल तेव्हाच पैसे काढावेत, आवश्यक तितकी रक्कम उपलब्ध आहे, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. बँका उशिरा उघडल्याने संताप: रविवारच्या दिवशी सकाळचे दहा वाजले तरी काही बँका उघडल्या नव्हत्या. नेहमीपेक्षा तासभर आधी म्हणजेच सकाळी 9 च्या सुमारास बँका उघडणं अपेक्षित असल्यामुळे रांगेतली व्यक्तींनी संताप व्यक्त केला. हळूहळू बँका उघडायला लागल्या तरी गर्दी कायम होती. भल्या पहाटेपासून अनेकांनी बँकांसमोर रांगा लावल्या होत्या. ही गर्दी कमी होण्याचं नाव घेत नाही. मात्र काही ठिकाणी बँका खुल्या असूनही पैसे नसल्याचं म्हटलं जातं. तर काही बँकांमध्ये लोकांना टोकन न मिळाल्याने गोंधळ पहायला मिळाला. अनेक एटीएममध्येही अद्यापही खडखडाट आहे.