मुंबई : रविवार असूनही आजच्या दिवशी देशभरातल्या बँका ग्राहकांसाठी सुरु राहणार आहेत. पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँका खुल्या राहणार आहेत. दुसरीकडे एटीएम मशिन्सबाहेरही ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागण्याची शक्यता आहे.

नागरिकांची गरज लक्षात घेऊन रविवारीही बँका सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे रविवारीही बँकेचे व्यवहार सुरुळीत सुरु राहणार आहेत, तर एटीएम व्यवस्था सुरळीत होण्यासाठी आठ ते दहा दिवसांचे अवधी लागेल, असं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.

जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा वापरातून रद्द झाल्यामुळे अनेकांची दैनंदिन व्यवहारात तारांबळ उडाली. त्यामुळे जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी अनेकांची बँक, पोस्ट ऑफिसमध्ये झुंबड उडाली.

काही महत्त्वाच्या ठिकाणी जुन्या नोटा वापरण्याची मुभा शुक्रवारच्या मध्यरात्रीपर्यंत देण्यात आली होती. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा वापरण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी केंद्र सरकारनं 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे पेट्रोल पंप, रेल्वे, विमान, मेट्रो तिकीट, रुग्णालयं, वीज बिल भरणा केंद्र, शासकीय कर भरण्यासाठी सोमवार मध्यरात्रीपर्यंत जुन्या नोटा वापरता येणार आहेत.