पुणे: पुण्याच्या 11 वर्षीय अन्विता प्रशांत तेलंग हिने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून तिने तयार केलेले डूडल बालदिनानिमित्त सोमवारी 14 नोव्हेंबर रोजी गूगलच्या होमपेजवर झळकले.

बालदिनाचे औचित्यसाधून गूगलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 'डूडल फॉर गूगल' ही स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा पहिली ते तिसरी, तिसरी ते सहावी आणि सहावी ते दहावी अशा एकूण तीन गटात घेण्यात आली. या स्पर्धेत पुण्याच्या बालेवाडीतील विबग्योर हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अनविताने नुकत्याच बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेसाठी 'मला या देशाला काय शिकवायचे असेल, तर काय शिकवणार?' असा प्रश्न दिला होता. या संकल्पनेवर आधारित आकर्षक 'डूडल' बनवून अन्विताने गूगलला पाठवले होते. तिचे हे डूडल आज गूगल इंडियाच्या होम पेजवर झळकले.

या स्पर्धेतील पहिल्या गटात विशाखापट्टणमच्या बी श्रिशा हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिने 'घरातील बाग' या विषयावरील 'डूडल' तयार केले होते. तर तिसऱ्या गटात रांचीच्या अक्षदीपने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले असून, त्याने 'पाणी वाचवा, भविष्य वाचवा' या विषयावरील 'डूडल' तयार केले होते.

''डूडल फॉर गूगल'च्या माध्यमातून प्रत्येक वयोगटातील मुलांच्या क्रिएटिव्हीटी, पॅशन आणि इमॅजिनेशनला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अन्विताने विजय मिळवल्याने, तिचे मी अभिनंदन करते.'' अशी गूगल इंडियाच्या मार्केटिंग विभागाच्या प्रमुखांनी दिली.

या स्पर्धेसाठी देशातील 50 शहरांमधून अनेकांनी सहभाग घेतला होता.