इंदूर : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना सरकारी योजनांची स्तुती करणं चांगलंच महागात पडलं आहे. इंदूरमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांना डॉक्टरांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. 'आयुष्मान भारत' सारख्या योजना सरकारने आणल्या खऱ्या, मात्र त्या योजनेचा पैसा डॉक्टर आणि रुग्णालयापर्यंत पोहोचत नाही, असा आरोप डॉक्टरांनी केला.
या कार्यक्रमात सुमित्रा महाजन या मोदी सरकारनं केलेल्या कामांचा आढावा मांडत होत्या. यावेळी सुमित्रा महाजन मोदी सरकारच्या स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत यासारख्या योजनांनी माहिती देत होत्या. या सर्व योजना यशस्वीरित्या सुरु असून एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नसल्याचं महाजन अभिमानाने सांगित होत्या.
सुमित्रा महाजन यांनी आयुष्मान भारत योजनेची माहिती देण्यास सुरुवात केली, त्यावेळी तेथे उपस्थित डॉक्टरांना ते पटलं नाही. काही डॉक्टरांनी या योजनेची अमंलबजावणी योग्यरित्या होत नसल्याचा आणि रुग्णांना सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सवलतींचा पैसा रुग्णालयाला पोहोचत नाही, असा आरोप केला.
डॉक्टरांच्या आरोपाला उत्तर देतांना सुमित्रा महाजन म्हणाल्या की, अनेकदा रुग्णांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा बिलाच्या नावाने वसूल केला जातो. अनेक लोक माझ्याकडे अशा तक्रारी घेऊन येतात. यावर भडकलेल्या डॉ. केएल बंडी यांनी सुमित्रा महाजन यांच्या हातातील माईक खेचून घेतला आणि म्हटलं की, मला एक बिल दाखवा ज्यात सरासरी बिल तीन ते चार लाख दिलं गेलं आहे. असं असेल तर मी वैद्यकीय क्षेत्र सोडून देईन, असंही डॉ. बंडी यांनी म्हटलं.
डॉक्टरांना बदनाम केलं जात आहे. योजनांचा पैसा सरकार आम्हाला वेळेवर देत नाही. पैसा वेळेवर मिळण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना काहीतरी हवं असतं. या परिस्थितीमुळे आज हुशार विद्यार्थ्यांनाही वैद्यकीय क्षेत्रात येण्याची इच्छा नाही. किमान वेद्यकीय क्षेत्राला तरी सोडा, असं डॉ. बंडी म्हणाले.
आयुष्मान भारत योजनेचा लाभ काय?
या योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या 10 कोटी कुटुंबांना दरवर्षी उपचारासाठी पाच लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळेल. एका कुटुंबात किती सदस्य असावेत याची मर्यादा नाही. देशातील दीड लाख गावांमध्ये आरोग्य केंद्र सुरु केले जाणार आहेत. जिथे फक्त उपचारच होणार नाही, तर नियमित तपासणीही केली जाईल.
ही योजना राष्ट्रीय आरोग्य विमा योजना आणि ज्येष्ठ नागरिक विमा योजनेची जागा घेईल. विमा संरक्षणासाठी वयाची कोणतीही अट नाही. अगोदरपासून असलेल्या आजारांचाही यामध्ये समावेश होईल. ही योजना कॅशलेस असेल, म्हणजेच रुग्णाने उपचार घेतल्यानंतर पैसे थेट रुग्णालयाला दिले जातील. या योजनेत 1350 वैद्यकीय सेवांचा समावेश आहे.
कोण आहेत योजनेचे लाभार्थी?
2011 च्या सामाजिक, आर्थिक जनगणनेनुसार, ग्रामीण भागातील 8.3 कोटी आणि शहरी भागातील 2.33 कोटी कुटुंबाचा यामध्ये समावेश आहे. जवळपास 50 कोटी जनतेला या योजनेचा फायदा होईल. नॅशनल हेल्थ एजन्सीने (एनएचए) राष्ट्रीय आरोग्य विमा अंतर्गत आयुष्मान भारत आरोग्य योजनेची वेबसाईटही लाँच केली आहे, ज्याअंतर्गत आपण या योजनेचे लाभार्थी आहोत का, याची पडताळणी करता येईल. वेबसाईटसोबतच एक फोन नंबरही देण्यात आला आहे, शिवाय रुग्णालयांमध्ये आयुष्मान मित्र असतील, जे लाभार्थ्यांना मार्गदर्शन करतील.