आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावरुन परतलेल्या पंतप्रधान मोदींनी मंगळवारी काश्मीर हिंसाचाराच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मोदींनी प्रसारमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली. यावेळी पंतप्रधानांनी बुरहानवर असलेल्या डझनभर गुन्ह्यांचा दाखला दिला. बुरहानने कशाप्रकारे काश्मीर खोऱ्यात दहशतवादाला प्रोत्साहन दिलं, हे सगळ्यांना माहित हवं, असंही मोदी म्हणाले.
हिंसाचारात आतापर्यंत 32 जणांना मृत्यू
भारतीय सैन्याने 8 जुलै रोजी त्याचा खात्मा केला. त्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचाराचं सत्र सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर फुटीरतावाद्यांच्या काश्मीर बंदचा आज अखेरचा दिवस आहे.
अनेक भागात कर्फ्यू कायम
काश्मीरमधील शोपियां, पुलवामा, कुलगाम आणि अनंतनाग परिसरात आजही कर्फ्यू कायम आहे. सर्व फुटीरतावादी नेत्यांना नजरबंद करुन ठेवण्यात आलं आहे. तर पावला-पावलाला सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
8 जुलैपासून धग
का धुमसतंय काश्मीर?
हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बुरहान वानी याला कंठस्नान घालण्यात आलं. जवानांनी आठ जुलैला अनंतनाग जिल्ह्यात बुरहानचा खात्मा केला. दीर्घ काळ चाललेल्या या चकमकीत बुरहानसोबत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सैन्याला यश आलं.
गेल्या 24 वर्षांत स्वतःचा आणि आपल्या साथीदारांचा फोटो सोशल मीडियावर टाकणारा बुरहान हा पहिला कमांडर होता.
9 जुलैला धग पेटली-
बुरहानच्या खात्म्यानंतर धगधग
बुरहानच्या खात्म्यानंतर फुटरतावादी नेत्यांनी 9 जुलैला बंदचं आवाहन केलं. या बंदचे पडसाद लक्षात घेत, प्रशासनाने काश्मीरच्या अनेक भागात कर्फ्यू जारी केला.
बुरहानच्या अंत्यविधीला प्रचंड गर्दी
फुटीरतावाद्यांसह अनेकांना जमावबंदीचा आदेश झुगारुन 9 जुलैला बुरहानच्या अंत्ययात्रेला हजेरी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी जमावाने हिंसक पद्धतीने विरोध प्रदर्शित केला होता. त्यामुळे प्रशासनाला जिल्ह्यात मोबाईल, इंटरनेटवर बंदी घालावी लागली. तसंच अमरनाथ यात्राही रोखण्यात आली.
10 जुलै
हिंसक जमावाने अनंतनागमध्ये एका पोलिसाला त्याच्या गाडीसह झेलम नदी फेकलं. यामध्ये त्या पोलिसाचा मृत्यू झाला. तर त्राल आणि शोपियांमध्ये हिंसक जमावाने दोन पोलिसांना लक्ष्य केलं.
हिंसक प्रदर्शनादरम्यान झालेल्या गोळीबारात पाच नागरिकांचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहन
काश्मीर पेटलं असताना, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
11 जुलै
काश्मीरच्या अनेक भागात अजूनही कर्फ्यू लागू आहे. मोबाईल, इंटरनेट सेवा बंद आहेत. तर अमरनाथ यात्रा सलग तिसऱ्या दिवशीही रखडलेली आहे.
12 जुलै
पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिकी देशांचा दौरा आटोपून भारतात परतले. भारतात आल्यानंतर सर्वात आधी त्यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.