नवी दिल्ली : दिवाळीच्या आधी आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हा निर्णय घेतला.
वाढीव भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे.

कर्मचाऱ्यांचा सध्याचा महागाई भत्ता 12 टक्के आहे. आता तो पाच टक्क्यांनी वाढवून 17 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील जवळपास 50 लाख कर्मचारी आणि 62 लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे. शिवाय यामुळे सरकारी तिजोरीवर 16 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.


वर्षभरातील दुसऱ्यांदा वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची वर्षभरातील ही दुसरी वेळ आहे. मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळातील अखेरच्या महिन्यात कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता 12 टक्के केला होता. त्याआधी त्यांना 9 टक्के महागाई भत्ता मिळत होता.