नवी दिल्ली : भारत-नेपाळ यांच्यात सीमावादानंतर जन्मस्थळांवरून वाद सुरू झाला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म भारतात झाल्याचं म्हटलं होतं. परराष्ट्र मंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर नेपाळ भडकला असून नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली आहे. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमध्ये झाल्याचं स्पष्ट केलं आहे.


भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका कार्यक्रमाला महात्मा गांधी आणि भगवान गौतम बुद्ध यांना भारतीय असल्याचं म्हटलं होतं. परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानावर नेपाळने आक्षेप घेतला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं याविषयी आपली बाजू मांडली आहे. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म भारतात नव्हे तर नेपाळमधील लुंबिनी येथे झाला होता. बुद्धांचं जन्मस्थळ युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीतील स्थळांपैकी एक आहे, असं नेपाळनं म्हटलं आहे


परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सीआयआयच्या शिखर संमेलनात बोलताना म्हणाले, महात्मा गांधी आणि भगवान गौतम बुद्ध असे भारतीय महापुरूष आहेत, ज्यांचं जग नेहमीच स्मरण करत असते. आतापर्यंतचे सर्वात महान भारतीय कोण असेल, तर मी म्हणेल गौतम बुद्ध आणि दुसरे महात्मा गांधी हे आहेत. त्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानावर नेपाळने आक्षेप घेतला आहे.


नेपाळने नकाशा दुरुस्ती विधेयकानुसार भारतातील उत्तराखंडमधील कालापानी, लीपूलेख आणि लिम्पियाधुरा हे प्रदेश आपले असल्याचं दाखवलं आहे. नेपाळने नव्या नकाशात भारताचा सुमारे 395 चौ. किमीचा भाग आपल्या सीमेत दाखवला आहे. नेपाळ भारतातील ज्या भागावर आपला दावा करत आहे, तो भाग 1816 मध्ये सुगौली करारानुसार भारताकडे आहे.


संबंधित बातम्या :