लखनौ (उत्तर प्रदेश) : दीक्षा दिंडे या महाराष्ट्राच्या लेकीचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरव झाला आहे. भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने यंदा पुण्यातील दीक्षा दिंडे हिला गौरवण्यात आले.

12 जानेवारीला उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील गौतम बुद्ध विद्यापीठात आयोजित 22 व्या राष्ट्रीय युवा संमेलनात पुरस्कार सोहळा पार पडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते दीक्षाला पुरस्कार प्रदान करण्यात आला.


दिव्यांग आणि वंचित समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी करत असलेलं काम, विविध प्रयत्न आणि एकूणच त्यांच्या समस्यांसदर्भातील तिची तळमळ, या सर्व गोष्टींची दखल घेऊन दिक्षाची निवड राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी करण्यात आली.

गेल्याचवर्षी दीक्षाची यूएनमध्ये भारताकडून शिक्षण राजदूत म्हणून निवड झाली होती. दीक्षाने यूएनमध्ये शिक्षण क्षेत्रातील काम, त्यासंदर्भातील नाविन्यपूर्ण कल्पना इत्यादी अनेकविध बाबींसह, शिक्षण क्षेत्रात अपेक्षित नवनवीन गोष्टींवरही तिने अभ्यासपूर्ण मांडणी केली.

जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर दीक्षाने घेतलेली गरुडझेप असंख्या तरुण-तरुणींना प्रेरणा देणारी आहे.

VIDEO : दीक्षा दिंडेवरील एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट (संग्रहित) : वेलडन दीक्षा