नवी दिल्ली : सरकारविरोधी आंदोलन केल्याचा राग मनात ठेवून दोन मराठी युवकांना दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात प्रवेश नाकारल्याची संतापजनक घटना समोर आलीय.


पानिपतावरच्या मराठा शौर्य दिनासाठी हे दोन युवक दिल्लीत आले होते. कार्यक्रम संपल्यावर आज नवीन महाराष्ट्र सदनाच्या कॅन्टीनमध्ये यायला ते निघाले होते. त्यावेळी त्यांना गेटवरच अडवण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ता अधिक चन्ने आणि प्रसाद खामकर अशी या दोघांची नावे आहेत.

काही दिवसांपूर्वी राज्यात महाराष्ट्र सुरक्षा बलाचं जे आंदोलन झालं होतं, त्यात या दोघांची भूमिका होती. त्यानंतर प्रसाद खामकर या युवकाला खात्यातून निलंबितही करण्यात आलं होतं. या खात्यांतर्गत कारवाईनंतरही समाधान न होऊन त्यांच्यावर या ना त्या प्रकारे सूड उगवण्याचा बालिशपणा सुरुच आहे.

महाराष्ट्र सदनाच्या सुरक्षा व्यवस्थेचे अतिरिक्त निवासी आयुक्त अजित नेगी यांनी या युवकांबद्दल इंटेलिन्सचा रिपोर्ट मिळाल्यानं त्यांना प्रवेश घेऊ दिला नाही असं अजब कारण पुढे केलंय.

मुळात इंटेलिजन्सच्या रिपोर्टला जिथे गांभीर्याने घ्यायचं तिथे न घेता या दोन तरुणांपासून असा काय धोका उत्पन्न होणार होता असा प्रश्न यानिमित्ताने समोर येतोय.

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या कॅन्टीनमध्ये एरव्ही दिल्लीतले शेकडो अमराठी, परप्रांतीयही येत असतात. मग मराठी व्यक्तींना केवळ कॅन्टीनमध्ये जाण्यापासून रोखण्याचं कारण काय असा सवाल या दोन तरुणांनी एबीपी माझाशी बोलताना विचारलाय.