नागपूर: डिजीधन योजनेअंतर्गत डिजीटल व्यवहार करणाऱ्या भाग्यवान विजेत्यांची नावं आज जाहीर करण्यात आली.

लातूरची श्रद्धा मेंगशेट्टे ही तरुणी 1 कोटी रुपयांच्या बक्षीसाची भाग्यवान विजेती ठरली. श्रद्धाने केवळ 1590 रुपयांचा डिजीटल व्यवहार केला होता. डिजीधन योजनेअंतर्गत ती भाग्यवान ठरली.

तर चिमन भाई प्रजापती ( गुजरात ) यांना 50 लाखाचं दुसरं आणि केवळ शंभर रुपयांचं डिजीटल पेमेंट करणारे भरत सिंह (देहरादून) यांना  25 लाख रुपयांचं तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं.

ग्राहक श्रेणी

1) श्रद्धा मेंगशेट्टे ( लातूर ) 1500 रु. डिजीटल पेमेंट करून 1 कोटीचं बक्षीस
2) चिमन भाई प्रजापती ( गुजरात ) 50 लाखांचं बक्षीस
3) भरत सिंह ( देहरादून ) 100 रु चे पेमेंट करून 25 लाख बक्षीस

नोटाबंदीनंतर सरकारने देशात डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना सुरु केल्या होत्या.

चार दिवसापूर्वी म्हणजेच 10 एप्रिलला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात या बंपर बक्षीसांची सोडत काढण्यात आली. मात्र त्यावेळी विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली नव्हती.

व्यापारी श्रेणी

दरम्यान, डिजीधन योजनेअंतर्गत ग्राहकांसह व्यापाऱ्यांसाठीही विविध बक्षीस मिळाली. यामध्ये चेन्नईच्या जी आर राधाकृष्णन यांना 50 लाखाचं पहिलं, ठाण्याच्या रागिनी उत्तेकर यांना 25 लाखाचं दुसरं आणि हैदराबादच्या शेख रफी यांना 12 लाखाचं तिसरं बक्षीस मिळालं.

1) जी आर राधाकृष्णन ( चेन्नई ) - 50 लाख चे पुरस्कार

2) रागिनी उत्तेकर ( ठाणे ) - 25 लाख पुरस्कार

3) शेख रफी ( हैदराबाद ) - 12 लाख चा पुरस्कार

मोबाईलचा हप्ता भरला, 1 कोटी जिंकले

मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या लातूरच्या श्रद्धानं काही दिवसांपूर्वी हफ्त्यांवर एक मोबाईल खरेदी केला होता. त्याच मोबाईलचा हफ्ता श्रद्धानं ऑनलाईन भरला होता.

याच व्यवहारासाठी तिला 1 कोटींचं बक्षीस मिळालं. लातूरमध्ये राहणाऱ्या श्रद्धा मेंगशेट्टेचे वडील किराणा दुकान चालवतात. मात्र, अवघ्या 1490 रुपयांच्या व्यवहारानं ती आता करोडपती झाली आहे.

या योजनेत 1 हजाराचीही अनेक बक्षीसं आहेत. मात्र आज नागपुरात प्रामुख्यानं बंपर ड्रॉ चे विजेते असणाऱ्या 6 प्रमुख भाग्यवतांना बक्षीस दिलं गेलं.