बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे खरंतर अंधश्रद्धेचे विरोधक मानले जातात. अंधश्रद्धाविरोधी कायद्याला त्यांनी जाहीरपणे समर्थनही दिलं होतं. मात्र, त्यांच्या एका कृत्यामुळे त्यांच्या अंधश्रद्धाविरोधी भूमिकेवरच प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाय, अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कारच्या बोनेटवर कावळा बसल्याने त्यांनी चक्क कारच बदलली. नुसती बदलली नाही, तर थेट नवीन कार खरेदी केली आणि तिही तब्बल 35 लाखांची टोयोटो फॉर्च्युनर खरेदी केली.
2 जून रोजी सिद्धरामय्या यांच्या बंगल्यासमोरील त्यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या बोनेटवर कावळा बसला आणि काव काव करु लागला. त्या कावळ्याला हाकलण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, कावळा तिथून हलण्याचं नाव घेत नव्हता.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, कावळ्याचं गाडीच्या बोनेटवर बसणं अपशकून असतं. शिवाय, गाडी बदलण्याचाही सल्ला दिला. त्यानंतर त्यांच्यासाठी त्याच रंगाची नवी कोरी कार खरेदी करण्यात आली.
मात्र, याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता, सिद्धरामय्या यांनी सारवासारव केली. गाडीवर ओरखडे असल्याने सर्व्हिसिंगसाठी पाठवल्याचं त्यांनी सांगितलं.