मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकरिणीच्या दोन दिवसीय बैठकीला आज अलाहबादमध्ये सुरुवात होत असून उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला जाण्याची शक्याता आहे. या बैठकीची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित होत असून पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह उत्तर प्रदेशमधील प्रमुख नेते तसेच सर्व भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.


 

सर्वेक्षणानंतरच ठरणार भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

 

दरम्यान, दोन दिवसीय बैठकीच्या समारोेपानंतर पक्षाच्यावतीने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानंतर ऑक्टोबरमध्ये भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

 

अलहाबादच्या केपी कॉलेज मैदानावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीची सुरुवात संध्याकाळी पाच वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षीय भाषणाने होणार आहे. तर उद्या दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या बैठकीचा समारोप होणार आहे.

 

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची रणनिती

 

या बैठकी दरम्यान आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यात येणार आहे. तसेच यासोबत पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गोव्याच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते.