सुरत : दिवाळीच्या मुहूर्तावर सावजी ढोलकिया या गुजरातच्या सुरतमधील हिरा व्यापाऱ्याने सलग चौथ्या वर्षी कर्मचाऱ्यांना बंपर बोनस दिला आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ढोलकिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस म्हणून 600 कार देत धमाकेदार बंपर गिफ्ट दिलं आहे. ढोलकियांनी यापूर्वी आपल्या कंपनीतील 1260 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केली आहे, तर 400 कर्मचाऱ्यांना घरखरेदी करण्यात मदत केली आहे.

ढोलकिया यांच्या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर 6 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यांचा व्यवसाय 71 देशांमध्ये विस्तारला आहे. काही कर्मचाऱ्यांना यापूर्वीच बोनसच्या रुपात कार देण्यात आली होती, तर काहींचा यावर्षी नंबर लागला आहे.

दोन वर्षापूर्वी कंपनीतील 491 कामगारांना कार भेट मिळाली होती. तर 207 कामगारांना दोन बेडरुमचा फ्लॅट दिवाळीचा बोनस म्हणून देण्यात आला होता. 503 कर्मचाऱ्यांना दागिने भेट म्हणून देण्यात आले होते. सावजी भाई ढोलकिया यांची हरे कृष्ण डायमंड एक्सपोर्ट कंपनीमध्ये जवळपास साडेपाच हजार कर्मचारी काम करतात. त्यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 6 हजार कोटी रुपये आहे. त्यांनी याआधी आपल्या कंपनीतील तीन कर्मचाऱ्यांना मर्सिडीज देखील गिफ्ट केली आहे. ढोलकिया यांच्याकडून या दिवाळीला आपल्या कर्मचाऱ्यांना 600 कार देऊन पुन्हा आपल्या मोठेपणाचा परिचय दिला आहे. ढोलकियांनी दिलेल्या बोनसमुळे कर्मचाऱ्यांमध्येही नवा उत्साह संचारला आहे. पुन्हा सरप्राईज गिफ्ट मिळेल, या आशेने कर्मचारी जोमाने कामाला लागले आहेत.