Air India: आपण प्रवास करताना अनेकदा बसचालक हलगर्जीपणा करत असल्याचं निदर्शनास येतं. त्यावेळी लोकांच्या सुरक्षिततेबद्दल निष्काळजीपणा दाखवणाऱ्या त्या चालकाला किंवा वाहकाला शिव्यांची लाखोली वाहिली जाते. पण हाच निष्काळजीपणा जर हवेत असणाऱ्या विमानामध्ये दिसला तर तर आपली काय परिस्थिती होईल यांचा अंदाज व्यक्त न केलेला बरा. असाच काहीसा प्रकार एअर इंडियाच्या दुबईहून दिल्लीला येणाऱ्या विमानात घडलाय. पायलटने आपल्या मैत्रिणीला चक्क विमानाच्या कॉकपिटमध्ये बसवलं आणि प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली.  


एअर इंडियाच्या फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये मैत्रिणीला बसू दिल्याप्रकरणी त्या पुरुष पायलटवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे.


पायलटवर कारवाई करतानाच DGCA ने एअर इंडियाच्या निष्काळजीपणाबद्दल विमान कंपन्यांना 30 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 27 फेब्रुवारीला दुबईहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये पायलटने आपल्या महिला मैत्रिणीला फ्लाईटच्या कॉकपिटमध्ये बसवले.


सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावली


ही कारवाई करण्याआधी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाच्या सीईओला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर डीजीसीएने आरोपी पायलटविरुद्ध तपास सुरू केला. पायलटने सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे डीजीसीएने म्हटले होते.


नियमांचे उल्लंघन केले


याशिवाय या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल आणि कोणतीही तक्रार न नोंदवल्याबद्दल एव्हिएशन सिक्युरिटीचे प्रमुख हेन्री डोनोहो यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. उड्डाणाच्या कमांडिंग पायलटने प्रवासी म्हणून प्रवास करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला DGCA नियमांचे उल्लंघन करून कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने त्याच्या अहवालात म्हटलं आहे.


डीजीसीएने म्हटले आहे की, सुरक्षेचे उल्लंघन करुनही एअर इंडियाने त्वरित सुधारात्मक कारवाई केली नाही. सुरक्षेच्या संवेदनशील मुद्द्याला तत्परतेने आणि परिणामकारक प्रतिसाद न दिल्याबद्दल एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विमान नियम 1937 अंतर्गत निहित अधिकाराचा गैरवापर आणि उल्लंघन करण्यास परवानगी दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात येत आहे. पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच डीजीसीएने को-पायलटच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले आहेत. कारण त्याने पायलटच्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये येण्याापासून रोखलं नाही. फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये अनधिकृत लोकांना प्रवेश करण्याची परवानगी नाही. असं जर कोणी असे केले तर ते नियमांचे उल्लंघन आहे.