नवी दिल्ली : व्यंकय्या नायडूंची उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी ही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणाची दारं उघडणारी ठरु शकते. कारण भाजपच्या पार्लमेंटरी बोर्ड अर्थात संसदीय मंडळात व्यंकय्या नायडूंच्या जागी ज्यांची वर्णी लागू शकते, त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे.

संसदीय बोर्ड ही भाजपची राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेणारी सर्वात महत्वाची कमिटी आहे. यात सध्या एकूण 12 सदस्य आहेत. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा समावेश झाल्यास ते संसदीय बोर्डातले भाजपचे दुसरे मुख्यमंत्री ठरतील. सध्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे संसदीय बोर्डात आहेत.

अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचा समावेश संसदीय बोर्डात झाला, तरी ते महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवत संसदीय बोर्डाची जबाबदारी पार पाडतील. शिवराजसिंह चौहान यांच्याप्रमाणेच एकाचवेळी ते दोन्ही कामकाज पाहू शकतात.

संसदीय बोर्डातला समावेश याचा दुसरा अर्थ राष्ट्रीय स्तरावर भविष्यातला चेहरा म्हणून पक्ष त्यांना पाहतोय, असाही होतो. त्यामुळेच छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह, राजस्थानच्या वसुंधरा राजे शिंदे यांच्याआधी देवेंद्र फडणवीस यांचा या संसदीय बोर्डात खरंच समावेश होणार का याची उत्सुकता आहे. शिवाय 46 वर्षांचे देवेंद्र फडणवीस हे संसदीय बोर्डातले सर्वात तरुण सदस्यही ठरु शकतील.

घटनात्मक पद सांभाळण्यासाठी व्यंकय्या नायडू यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदासोबतच पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला आहे. त्यांचं माहिती प्रसारण खातं स्मृती इराणी यांना तर शहर विकास मंत्रालय हे नरेंद्र तोमर यांना देण्यात आलं. त्यापाठोपाठच संसदीय बोर्डातल्या या बदलाचीही शक्यता सुरु आहे. अर्थात मंत्रिमंडळ फेरबदलाइतका वेगानं हा निर्णय होईलच याची खात्री नाही. पण त्याबद्दलच्या चर्चा मात्र जोरात सुरु झाल्या आहेत.