नवी दिल्ली : काँग्रेसच्या हायकमांड राजकारणावर भाजपकडून सातत्याने टीका करण्यात येते. मात्र, आता तोच कित्ता भाजपने गिरवत हायकमांड राजकारण जोरात सुरु केलं आहे. भाजपला निकाल लागून सहा दिवस झाले, तरी अजूनही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही. राजस्थानमध्ये (Rajasthan) भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक कधी होणार? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही. राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी म्हणाले की, लवकरच माहिती दिली जाईल. त्यांनी अद्याप कोणतीही तारीख दिलेली नाही. मुख्यमंत्रीपदासाठी निरीक्षक नेमले असून लवकरच माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. कारण, अनेक ज्येष्ठ नेते जयपूरच्या बाहेर आहेत. गजेंद्र सिंह शेखावत आणि वसुंधराराजे शिंदे जयपूरमध्ये नसल्याने चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशोक गेहलोत यांच्यावर हल्लाबोल करताना सीपी जोशी म्हणाले की, विरोधी पक्षनेते ठरवू शकत नाही. त्यांनी आपला विरोधी पक्षनेता ठरवावा आणि स्वतःची काळजी घ्यावी.
राजस्थानचा सीएम मराठी माणूस ठरवणार
भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी राजस्थानसाठी भाजपने राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांना निरीक्षक म्हणून पाठवलं आहे. मध्य प्रदेशात हरियाणाचे सीएम मनोहर लाल खट्टर, के. लक्ष्मण व आशा लाखेड यांना निरीक्षक म्हणून पाठविण्यात आलं आहे. अर्जुन मुंडा आणि सर्बानंद सोनोवाल यांना छत्तीसगडला निरीक्षक म्हणून पाठवले जात आहे. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर मराठी मोहोर असणार आहे.
मध्य प्रदेशात नवीन मुख्यमंत्र्याचा सस्पेन्स 48 तास कायम राहणार (Madhya Pradesh)
दुसरीकडे, मध्य प्रदेशातही नवीन मुख्यमंत्र्याचा सस्पेन्स पुढील ४८ तास कायम राहणार आहे. सोमवारी (11 डिसेंबर) निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतरच नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाईल. दरम्यान, राजस्थानप्रमाणे मध्य प्रदेशातही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा मुद्दा जटील बनला आहे. पक्षांतर्गत एकाही नावावर एकमत नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असतानाच, मध्य प्रदेश भाजपचे प्रभारी मुरलीधर राव यांनी शुक्रवारी (8 डिसेंबर) दावा केला की, येत्या दोन दिवसांत तीन राज्यांचे मुख्यमंत्री समोर येतील. राव म्हणाले की, पक्षाने तीन राज्यांसाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. निरीक्षक संबंधित राज्यांना भेट देतील आणि पक्ष दोन दिवसांत त्या तीन राज्यांसाठी मुख्यमंत्रिपदाचे चेहरे जाहीर करेल.
मुख्यमंत्रीपदासाठी शिवराज सिंह यांच्या नावाला विरोध
भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्षाला मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांची बदली हवी आहे. शिवराजसिंह चौहान यांना निवडणुकीपूर्वीच याबाबतचे संकेत देण्यात आल्याचेही बोलले जात आहे. एका राष्ट्रीय सरचिटणीससह 7 खासदार (ज्यात तीन केंद्रीय मंत्री होते) निवडणूक लढवण्याचा निर्णयही पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या रणनीतीचा भाग होता. लाडली बहन योजनेच्या बंपर यशामुळे आणि मोठ्या ओबीसी चेहऱ्यांच्या उपस्थितीमुळे भाजप हायकमांडला आता शिवराजसिंह चौहान यांच्या जागी दुसऱ्याला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देऊन निवडणुकीनंतर नफा-तोट्याचा अंदाज घ्यावा लागणार आहे. यासोबतच विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या एका दिग्गज नेत्याने थेट शिवराज सिंह चौहान यांच्या नावाला विरोध केला आहे. या नेत्याने शिवराज यांच्या जागी कोणालाही मुख्यमंत्री करायला हरकत नाही, असे स्पष्टपणे पक्षाच्या हायकमांडला सांगितल्याचे बोलले जात आहे.
छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम (Chhattsgarh )
छत्तीसगडमध्ये उद्या रविवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल आणि राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने छत्तीसगडसाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे जे तेथील मुख्यमंत्री निवडतील. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम यांना निरीक्षक बनवण्यात आले, त्यापैकी मुंडा आणि सोनोवाल रविवारी छत्तीसगडला भेट देणार आहेत. तर दुष्यंत गौतम म्हणतात की, छत्तीसगडमध्ये लवकरच मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली जाईल.
कोणती नावे शर्यतीत आहेत?
छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेसह सरकार स्थापन होणार आहे. मात्र, अशी काही नावे आहेत ज्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. आदिवासींकडून भरघोस मते मिळाल्याने यावेळी भाजप एखाद्या आदिवासी नेत्याकडे राज्याची कमान सोपवू शकते, असे मानले जात आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला देशातील आदिवासी मतदारांना आणि आदिवासीबहुल राज्यांनाही संदेश द्यायचा आहे. अशा स्थितीत रेणुका सिंह, लता उसेंडी, गोमती साई या तीन नावांची चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष अरुण साव हेही शर्यतीत आहेत. रमण सिंह आणि ओपी चौधरी हेही दावेदार आहेत.
या सर्वांमध्ये रेणुका सिंह यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे. भाजपच्या सरचिटणीस राहिलेल्या रेणुका सिंह हा छत्तीसगडमधील भाजपचा मोठा आदिवासी चेहरा आहे. त्या केंद्रात मंत्री होत्या. भरतपूर-सोनहाट मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने त्यांना खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगितले आणि त्यांनी त्याचे पालन केले. यानंतर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नेड्डा यांचीही भेट घेतली.
इतर महत्वाच्या बातम्या