Government Alert Painkiller Meftal SPAS : छोट्या-मोठ्या दुखण्यावर आपण सहज पेनकिलर (Painkiller) घेतो. काही पेनकिलर मेडिकलमध्ये (Medical) सहज उपलब्ध असतात. मासिक पाळीच्या वेळी पोटदुखीवर इलाज किंवा साधारण अंगदुखीवर इलाज म्हणून अनेक जण मेफ्टल स्पास (Meftal SPAS) घेतात. ही गोळी अनेक घरांमध्ये सहज उपलब्ध असते. तुम्हीही अशा कारणासाठी मेफ्टाल स्पास गोळी घेत असाल तर, सावधान या गोळीच्या तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. केंद्र सरकारने मेफ्टाल स्पास गोळीबाबत इशारा दिला आहे.


मेफ्टाल स्लासचा वापर करणाऱ्यांने सावधान


केंद्र सरकारने पेनकिलर मेफ्टाल स्लासच्या वापराबाबत इशारा दिला आहे. या गोळीचं सेवन करताना काळजी घेण्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. या गोळीमध्ये आढळणारे मेफेनेमिक ॲसिड गंभीर एलर्जिक रिएक्शनसाठी कारणीभूत ठरू शकतं. मेफेनेमिक ॲसिड (Mefenamic Acid) ड्रेस (DRESS) म्हणजेच इओसिनोफिलिया आणि सिस्टमॅटिक सिंप्टम्स सिंड्रोम (Drug Reaction with Eosinophilia and Systemic Symptoms) निर्माण करु शकतो, त्यामुळे याचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठी सरकारने इशारा दिला आहे. 


दुष्परिणाम होण्याची शक्यता


मेफेनेमिक ॲसिड (Mefenamic Acid) चा वापर करून मेफ्ताल स्पास तयार करण्यात येते. संधिवात (Gout/ Gouty Arthritis), ऑस्टियोआर्थरायटिस (Osteoarthritis) यासारखे हाडांचे रोग, तसेच मुलींमध्ये मासिक पाळीत वेदना, सामान्य वेदना, सूज, ताप आणि दातदुखी यावर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीसीने (IPC-Indian Pharmacopoeia Commission) आपल्या सुरक्षिततेचा इशारा देत म्हटलं आहे की, फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया (PVPI) डेटाबेसमधून मेफ्ताल स्पास गोळीच्या दुष्परिणामांच्या प्राथमिक विश्लेषणातून ड्रेस (DRESS) सिंड्रोम झाल्याचं समोर आलं आहे.


What is DRESS Syndrome : ड्रेस सिंड्रोम काय आहे?


ड्रेस (DRESS) सिंड्रोम (Syndrome) काही औषधांमुळे होणारी गंभीर एलर्जी आहे. यामुळे शरीरावर रिॲक्शन होते, ज्यामुळा त्वचेवर लाल रंगाचे चट्टे किंवा व्रण उठतात, ताप येतो किंवा लिम्फ नोड्स (Lymph Nodes) या ग्रंथींना सूज येते. हे एलर्जी रिॲक्शन गोळ्यांचे सेव केल्यानंतर दोन ते आठ आठवड्यांमध्ये दिसू शकते.


अलर्टमध्ये काय म्हटलं?


आयपीसीने (Indian Pharmacopoeia Commission) 30 नोव्हेंबरला जारी केलेल्या अलर्टमध्ये म्हटलं आहे की, 'डॉक्टर, रुग्ण आणि ग्राहकांना औषध Meftal Spas च्या वापराशी संबंधित दुष्परिणामांच्या संभाव्यतेचे बारकाईने निरीक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. औषध घेतल्यानंतर तुम्हाला शरीरात कोणत्याही प्रकारची रिॲक्शन दिसल्यास संबंधितांनी www.ipc.gov.in - किंवा Android मोबाइल ॲप ADR PvPI आणि PvPI हेल्पलाइनद्वारे एक फॉर्म भरून मदत मिळवू शकता आणि तक्रार नोंदवू शकता.