नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर एकीकडे कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण कमालीचे वाढले आहे, तर दुसरीकडे आणखी एक बदल दिसून येत आहे. नोटाबंदीनंतर देशभरात क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्डचा वापर वाढल्याचं चित्र आहे.

नोटाबंदीपूर्वी देशातील 40 टक्के लोक डेबिट कार्डचा वापर करत होते. पण 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर, डेबिट कार्डच्या वापराचे प्रमाण 60 टक्क्यावर पोहचलं आहे. याचाच अर्थ नोटाबंदीनंतरच्या काळात देशातील जनतेनं क्रेडिट कार्डच्या वापराऐवजी डेबिट कार्ड वापरण्याला जास्त पसंती दिली. त्यामुळे डेबिट कार्डनं क्रेडिट कार्डला पर्यायी वापर म्हणून मान्यता मिळाल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, डेबिट कार्डचा हा ट्रेंड लहान शहरांमध्ये सर्वाधिक पहायला मिळाला. लहान शहरांमध्ये डेबिट कार्डच्या वापरामध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळालं. नोटाबंदीपूर्वी हेच प्रमाण छोट्या शहरांमध्ये मात्र 2 टक्के होते. पण नोटाबंदीनंतर त्यात 3 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं. मात्र, जानेवारीमध्ये या प्रमाणात थोडी घट झाल्याचं पाहायला मिळाली.

यासंदर्भात पेमेंट कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेबिट कार्डचा सर्वाधिक वापर हा पेट्रोल पंप, ट्रॅव्हल बुकिंग आदी ठिकाणी सर्वाधिक झाल्याचं दिसून आलं. तर सरकारी बँकांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2016 मध्ये सरकारी बँकांच्या 61.7 कोटी डेबिट कार्डवरुन 10,893 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. तर खासगी आणि परदेशी बँकांच्या 12.25 कोटी डेबिट कार्डच्या माध्यमातून 11,048 कोटी रुपयांचे व्यवहार झाले.

त्यात नोटाबंदीच्या निर्णयानंतर यामध्ये मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालं. या वर्षी जानेवारी महिन्यात सरकारी बँकांच्या डेबिट कार्डच्या माध्यमातून 29,339 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. तर दुसरीकडे खासगी आणि परदेशी बँकांच्या डेबिट कार्डमधून 19,664 कोटी रुपयांचे व्यवहार झाले.

नोटाबंदीपूर्वी प्रत्येकी 100 डेबिट कार्डच्यामागे 19 व्यवहार हे महिन्यातून एकदा होत होते. पण नोटाबंदीनंतर हे प्रमाण कमालीचं वाढलं. डिसेंबर 2016 मध्ये 100 पैकी 54 व्यवहार हे डेबिट कार्डच्या माध्यमातून झाल्याचं पाहायला मिळत होते. मात्र, जानेवारी महिन्यात पुन्हा यात घट होऊन 40 टक्के व्यवहार डेबिट कार्डमार्फत होत होते.

दरम्यान, बँकिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी या प्रमाणात आणखी वाढ होईल असं आपेक्षा व्यक्त केली आहे. जर डेबिट कार्डधारकांनी सरासरी महिन्यातून एकदातरी आपल्या डेबिट कार्डवरुन व्यवहार केल्यास, डेबिट कार्ड वापराचे प्रमाण 80 टक्क्यापर्यंत पोहचेल असं त्यांनी मत नोंदवलं आहे. तसेच लहान शहरांमधील सरकारी बँकांच्या डेबिट कार्ड वापराचे प्रमाण झापट्याने वाढलेले दिसेल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

एनपीसीआय (National Payments Corporation of India)च्या मते, मोठ्या शहरांमध्ये क्रेडिट कार्डच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. यामागे क्रेडिट कार्डच्या वापराबद्दल बँकांकडून देण्यात येणाऱ्या रिवॉर्ड पाईंटचं कारण देण्यात येतंय. पण दुसरीकडे लहान शहरांमधील नागरिकांकडे फक्त डेबिट कार्डचाच पर्याय उपलब्ध आहे.