नवी दिल्ली : निवडणुकीत उमेदवारांची संख्या वाढली, तर त्यांच्यासाठी वेगवेगळी निवडणूक चिन्ह उपलब्ध करुन देणं हे निवडणूक आयोगाच काम असतं. त्यामुळे यावेळी दिल्ली महापालिका निवडणुकीत निवडणूक आयोगाने चार्जर, शिमला मिरची, भेंडी यांसारखे चिन्ह दिले आहेत.


दिल्ली महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत 87 एवढी चिन्ह होती, तर यावेळी हा आकडा 164 झाला आहे. निवडणूक आयोगाने माचिस, नूडल्स, कढाई, फोन चार्जर, पंचिंग मशिन, ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी अशी नवनवीन चिन्ह दिली आहेत.

2012 साली झाडू हे चिन्ह राखीव होतं, मात्र नंतर ते आम आदमी पार्टीला देण्यात आलं. तर इतर चिन्ह वेगवेगळ्या पक्षांना देण्यात आले. त्यामुळे यावेळी नवीन चिन्ह देणं आव्हान होतं. उमेदवारांची संख्या वाढतच आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने 164 चिन्हांची यादी तयार केली आहे, असं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोग हीच यादी निवडणूक चिन्ह म्हणून उमेदवारांना वितरीत करणार आहे. 23 एप्रिल रोजी दिल्ली महापालिकेसाठी निवडणूक होणार आहे.

यावेळची दिल्ली महापालिका निवडणूक चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. कारण अगोदरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक बॅलेट पेपरद्वारे करण्याची मागणी केली होती. तर भाजपने नवख्या उमेदवारांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे शिवसेनाही भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांना घेऊन दिल्ली महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.

'आप'चा ईव्हीएमला विरोध

“जर उत्तर प्रदेशात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका बॅलेट पेपरने होऊ शकतात, तर दिल्लीतही महापालिका निवडणूक बॅलेट पेपरद्वारे होऊ शकतात. ईव्हीएममधील घोळाच्या संशयाने दिल्ली सरकार महापालिका निवडणुकीत ईव्हीएमची रिस्क घेऊ इच्छित नाही. त्यामुळे बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्यासाठी अरविंद केजरीवाल आग्रही आहेत,” असं आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी सांगितलं.

भाजपचा नवीन प्रयोग

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत कुठल्याच विद्यमान नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळणार नाही, असा निर्णय भाजपने घेतला आहे. एप्रिल महिन्यात दिल्लीतल्या 3 महानगरपालिकेच्या निवडणुका होतायेत. त्याची रणनीती ठरवण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात कोअर कमिटीची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.

दिल्लीतल्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व या तीनही महापालिकांवर सध्या भाजपची सत्ता आहे. एकूण 272 नगरसेवकांपैकी 153 नगरसेवक भाजपचे आहेत. या निवडणुकीत यावेळी आम आदमी पक्ष, काँग्रेसचंही आव्हान आहे. त्याला तोंड देण्यासाठी भाजपनं सगळे नवे चेहरे मैदानात उतरवण्याचं ठरवलंय. या कठोर निर्णयानं काही नगरसेवकांवर रडकुंडीची वेळ आलीय. पण तरीही पक्षासाठी आपण त्याग करायला तयार आहोत असं ते म्हणतायत.

नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा अमित शहांनीच पक्षात अशा पद्धतीचा फॉर्म्युला राबवलेला आहे. हा यशस्वी झालेला गुजरात फॉर्म्युला आता ते दिल्लीतही आणत आहेत. दिल्ली महापालिकेतल्या अनेक मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानं हा बदल भाजपच्या पथ्यावरच पडेल अशी शक्यता आहे.

शिवसेनाही दिल्ली महापालिकेच्या आखाड्यात

दिल्लीत होणाऱ्या तीन आगामी महापालिकेच्या निवडणुकीत आता शिवसेनाही मैदानात उतरणार आहे. दिल्लीत तब्बल दीडशे जागा शिवसेना लढवणार असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, आज खासदार चंद्रकांत खैरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थितीत प्रचार व्हॅनचंही उद्घाटन करण्यात आलं.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे शिवसेनेनं त्याचचं उट्टं काढण्यासाठी आता दिल्लीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भाजपचे नाराज नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत कुठल्याच विद्यमान नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळणार नसल्याचं पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी जाहीर केलं. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. याचाच फायदा घेण्यासाठी आता शिवसेनेनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात दिल्लीतल्या 3 महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.

संबंधित बातम्या :


भाजपचा कौतुकास्पद निर्णय, विद्यमान नगरसेवकांना तिकीट नाही


दिल्ली महापालिका निवडणूक बॅलेट पेपरद्वारे करा : केजरीवाल


दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनाही मैदानात