नवी दिल्ली : शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी शिवसेना नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांची घेतलेली भेट फलदायी ठरण्याची शक्यता आहे. या प्रश्नी सलोख्यानं तोडगा काढण्याचा सल्ला सुमित्रा महाजन यांनी दिला. त्यामुळे लवकरच गायकवाडांना पुन्हा उड्डाण करता येण्याची शक्यता आहे.


मी कुठलं जजमेंट द्यायचं म्हणून सांगत नाही, तर ताई म्हणून सांगते, सुमित्रा महाजन यांनी  बैठकीत म्हटल्याची माहिती आहे. शिवसेना खासदारांसह केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपतीही यावेळी उपस्थित होते.

एअर इंडियाच्या फ्लाईटमधल्या चप्पलमार प्रकरणानंतर शिवसेनेनं नवा व्हिडिओ जारी करत खासदार रवींद्र गायकवाड यांची पाठराखण केली आहे. मारहाण होण्याआधी गायकवाड यांनाच कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप शिवसेनेने केला. इतकंच नाही, तर एअर होस्टेसनंही रवींद्र गायकवाड यांची चूक नसल्याची शक्यता वर्तवली आहे.

गायकवाड यांनी लोकसभाध्यक्षांना सविस्तर पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. माझं तिकीट बिझनेस क्लासचं नसल्याची सूचना मला कंपनीने दिली नाही. तक्रार करण्यासाठी मी पुस्तिका मागितली, पण ती शेवटपर्यंत मिळाली नाही. वरिष्ठांना बोलवण्याची विनंती केली, त्यावेळी सुकुमार यांनी गोंधळ करायला सुरुवात केली. इतर कर्मचारी त्याला शांत राहण्यास सांगत होते, पण तो अंगावर धावून आला, असा दावा गायकवाडांनी तक्रारीत केला आहे.

शिवसेनेनंही गायकवाड यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण मागितलेले नाही. उलट विमानप्रवास नाकारल्याप्रकरणी लोकसभेत हक्कभंग आणण्याचा प्रयत्न केला. खासदारांना मिळालेल्या वागणुकी प्रकरणी सोमवारी अख्खं उस्मानाबाद बंद होतं, पण खासदारांचं दर्शन झालं नाही.

शिवसेनेकडून लक्षवेधी

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी बंदी आणल्याप्रकरणी, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेत लक्षवेधी मांडली.

गायकवाडांवर आणलेली बंदी ही चुकीची असल्याचं मत अडसूळांनी मांडलं. तसंच हा संचार स्वातंत्र्यावर घाला असल्याचंही आडसूळ म्हणाले.

“एअर इंडियाने खासदारांवर गुन्हा दाखल केला. पण सर्वच विमान कंपन्यांनी बंदी घालणे चुकीचे आहे. संविधानानुसार कुठेही प्रवास करता येतो. बंदी घालणे हे आपल्या हक्कापासून वंचित करणे आहे. माझी अपेक्षा आहे की, सर्व खासदार सहकार्य करतील.

अध्यक्षांनी सरकारला निर्देश द्यावे, कपिल शर्मा यांनी मारहाण केली परंतु त्यावर चौकशी सुरु आहे. नागरी उड्डाणमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. विमान कंपन्यांनी बंदी उठवावी”, असं अडसूळ म्हणाले.

खासदार अडसूळ यांनी मांडलेल्या लक्षवेधीला केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपतीराजू यांनी उत्तर दिलं.

अशाप्रकारची बंदी घालण्याचा निर्णय हा आश्चर्यकारक असून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचं अशोक गजपतीराजू यांनी म्हटलं.

अशोक गजपती राजू यांचे उत्तर

“कोणत्याही प्रवाशाला बंदी घालता येत नाही. खासदार हे सुद्धा प्रवासी आहेत. खासदार म्हणून भेदभाव करु शकत नाही सुरक्षेबाबत तडजोड करता येणार नाही”, असं नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू म्हणाले.

एअर हॉस्टेस गायकवाडांच्या बाजुने

या संपूर्ण घटनेची साक्षीदार असलेली एअर इंडियाच्या एअर होस्टेसने रवींद्र गायकवाड यांची बाजू मांडली आहे. “शिवसेना खासदार ड्यूटी मॅनेजरचं गैरवर्तन थांबवण्याचा प्रयत्न करत होते. ड्यूटी मॅनेजरला शिडीवर ढकलण्याचा त्यांचा कोणताही इरादा नव्हता,” असं एअर होस्टेसने सांगितलं.

एअर होस्टेसच्या माहितीनुसार, “विमानातील सामान्य प्रवाशांप्रमाणे रवींद्र गायकवाड प्रवास करत होते. विमानाच्या क्रू मेंबरसोबत त्यांचं वर्तन सभ्य होतं. रवींद्र गायकवाड अचानक हिंसक होतील, याची अपेक्षा नव्हती. एअरलाईन्सच्या मॅनेजमेंट अधिकाऱ्याशी त्यांना बोलायचं होतं, म्हणून ते विमानातून उतरत नव्हते. त्यांना जे-क्लासचा बोर्डिंग पास दिला होता आणि त्याबदल्यात त्यांना इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आलं होतं. या मार्गावरील विमानात सर्व जागा इकॉनॉमी सीटच होत्या.”

“याच कारणामुळे खासदार गायकवाड यांची ग्राऊंड स्टाफसोबत बाचाबाची झाली. यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी भेटण्याची मागणी केली, तेव्हा ड्यूटी मॅनेजर सुकुमार तिथे आले. ते प्रामाणिकपणे त्यांची ड्यूटी करत होते, पण त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने गोंधळ झाला. कदाचित खासदार रवींद्र गायकवाड यांनीही ती बाब चुकीच्या पद्धतीने घेतली. दोघांमधील बाचाबाचीचं रुपांतर मारहाणीत झालं,” असंही एअर होस्टेसने सांगितलं.

“यानंतर खासदाराने चप्पल काढली आणि ते सुकुमार यांना मारणार होते. त्यासोबतच गायकवाड सुकुमार यांना शिडीच्या दिशेने घेऊन जात होते. मला गायकवाड यांची भीती वाट नव्हती. कारण प्रवासादरम्यान ते मला ताई म्हणत होते. तसंच इतर महिला कर्मचाऱ्यांसोबतही विनम्रतेने वागत होते,” असं एअर होस्टेसने सांगितलं. यामुळेच एयर होस्टेसने पुढे जाऊन खासदार गायकवाड यांना थांबवलं. एअर होस्टेसने कायदा हातात घेऊ नका, असं सांगितल्यानंतर गायकवाड यांनीही ऐकलं आणि सुकुमार यांना सोडलं.

गायकवाडांची प्रतीक्षा

ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमधून एकाएकी गायब झालेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड अद्याप उस्मानाबादला परतलेले नाहीत. दोन दिवस उलटूनही गायकवाड उमरग्याला परतले नसल्यामुळे ते कुठे आहेत आणि ते कधी परतणार याकडे त्यांचे कुटुंबीय, समर्थक आणि ‘त्या’ दोघांचे डोळे लागले आहेत.

खासदार रवींद्र गायकवाड परदेशी कुत्र्यांचे शौकीन आहेत. खासदारांच्या घरी एक अमेरिकन आणि एक फ्रान्सचा धिप्पाड कुत्रा आहे. ही कुत्री त्यांनी कोलकाताहून विकत आणली आहेत. या कुत्र्यांच्या राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि मनुष्य आहे. उमरगेकरांसारखीच या कुत्र्यांना आपल्या गायब झालेल्या मालकाची प्रतीक्षा आहे.

देशातल्या प्रमुख विमान कंपन्यांनी गायकवाडांना काळ्या यादीत टाकल्यानंतर ते ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसनं मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र मुंबईत येण्याऐवजी गायकवाड वापी स्थानकावर उतरुन उस्मानाबादला रवाना झाले होते. मात्र रवी गायकवाड उस्मानाबादला परतलेले नाहीत.

म्हणून सरांचा संयम सुटला

विशेष म्हणजे रवींद्र गायकवाडांनी विमानात ज्या व्यक्तीला मारहाण केली, तो एअर इंडियाचा अधिकारी नसल्याचा दावा गायकवाडांच्या कुटुंबीयांनी केला आहे. आधी धक्काबुक्की केल्यामुळे ‘सरां’चा संयम संपल्याचं कुटुंबाला वाटतं.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चप्पलेनं मारहाण करणं शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना चांगलं महागात पडलं आहे. कारण एअर इंडियाच्या तक्रारीनंतर गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्याआधी देशातल्या प्रमुख एअरलाईन्स कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांना काळ्या यादीत टाकत, त्यांच्या विमान प्रवासावर निर्बंध आणले आहेत.

गायकवाडांना मुंबई गाठण्यासाठी ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसनं प्रवास करावा लागला. राजस्थानातील कोटा रेल्वे स्थानकावर पत्रकारांनी गायकवाडांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र गायकवाडांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यावेळी रवींद्र गायकवाडांची पत्रकारांसोबत बाचाबाची देखील झाली. या प्रकरणावर उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देतील असं रवींद्र गायकवाड म्हणाले. अखेर वापीला उतरुन ते रस्ते मार्गाने उस्मानाबादला रवाना झाल्याची माहिती आहे.

एअर इंडिया आणि फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सनं गायकवाड यांना कोणत्याही विमानातून प्रवास करण्यास बंदी घातली आहे. गायकवाड यांनी खरं तर विमानानेच प्रवास करण्याची भाषा केली होती. मात्र गायकवाड येणार म्हणून दिल्ली विमानतळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यामुळे गायकवाड विमानतळाकडे फिरकलेच नाही. रवी गायवाड यांनी एअर इंडियाविरुद्द तक्रार दिली. त्यात त्यांनी धक्काबुक्की केल्याचं म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला.

VIDEO: खा. रवींद्र गायकवाडांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद

विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे.

… म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड

‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही,  मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो,  अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.

गायकवाड यांची गुंडगिरी कॅमेऱ्यात कैद

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद झाली. पुण्याहून दिल्लीला परतताना रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात अधिकाऱ्याला मारहाण केली. या घटनेनंतर एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी रवी गायकवाड यांना समजावलं होतं.

शिवसेनेची पहिला प्रतिक्रिया

गायकवाडांनी हिंसक होणं योग्य नसल्याचं मत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ‘गायकवाड यांनी असं करायला नको होतं. ते लोकप्रतिनिधी आहेत. खासदार असो, आमदार असो, मंत्री असो, कोणी इतक्या पटकन हिंसक होणं योग्य नाही.’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘या प्रकरणात कोणाची चूक आहे, हे पाहायला हवं. कोणी सुरुवात केली, हे बघणं महत्त्वाचं आहे’ असंही शिंदे म्हणाले. गायकवाडांवर कारवाई करणार का, या प्रश्नाला उत्तर देताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आपल्याकडे एअर इंडियाचं तिकीट असून एअर इंडियाच्या विमानातूनच प्रवास करणार असल्याचं रवींद्र गायकवाडांनी स्पष्ट केलं होतं. तसंच मोदींचा एकेरी उल्लेख केल्यामुळंच आपण मारहाण केल्याचा दावा गायकवाडांनी केला. मात्र एअर इंडियाने गायकवाड यांचं विमान तिकीटच रद्द केलं.

भारतीय विमान संघाची बंदी

भारतीय विमान संघानं गायकवाडांवर बंदी घातली आहे. जवळपास भारतातील सर्व विमान कंपन्यांनी गायकवाडांवर बंदी घातली आहे. भारतीय विमान संघामध्ये गोएअर, जेट एअरवेज, जेटलाईट, इंडिगो यासारख्या प्रमुख विमान कंपन्यांचा समावेश आहे.

कोण आहेत रवींद्र गायकवाड?

– रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत
– लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.
– उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचित आहेत
– रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते.
– दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे.
– तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला.

संबंधित बातम्या :


प्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बाजूने


मीडियाशी बोलू नका, उद्धव ठाकरेंकडून खा. गायकवाड यांना समज


रवींद्र गायकवाड उस्मानाबादला आलेच नाहीत, 'ते' दोघेही...


कपिल शर्मावर बंदी नाही, मग खा. गायकवाडांवर का?: खा. अडसूळ


खा. रवींद्र गायकवाड गायबच, शिवसैनिकांची उस्मानाबाद बंदची हाक


खा. रवींद्र गायकवाड यांचं लेखी स्पष्टीकरण


गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार


लोकप्रतिनिधींनी पटकन हिंसक होणं अयोग्य : एकनाथ शिंदे


पुन्हा त्याच विमानाने जाणार, एअर इंडियाने अडवून दाखवावं : गायकवाड


एअर इंडियाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात तक्रार


… म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड


शिवसेनेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याचा पुतळा जाळला