नवी दिल्ली : दिल्लीत भरदिवसा झालेल्या शिक्षिकेच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 38 वर्षीय शिक्षिकेच्या पतीनेच तिची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. 26 वर्षीय मॉडेल एंजल गुप्तासोबत असलेल्या अनैतिक संबंधांतून हे हत्याकांड घडलं.


बवाना मर्डर केस म्हणून ओळखल्या गेलेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेचा पती मनजीत आणि मॉडेल एंजल गुप्ता यांना अटक केली आहे. मनजीतने एंजलच्या साथीने पत्नीच्या हत्येसाठी दहा लाख रुपयांची सुपारी दिली होती.

दिल्लीतील बवाना भागात 29 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता बाईकस्वारांनी सुनिता यांची गोळी मारुन हत्या केली होती.

शिक्षिकेच्या हत्येनंतर पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. पोलिसांच्या हाती कोणताच पुरावा नव्हता, तसंच कोणते साक्षीदारही नव्हते. अखेर शिक्षिकेच्या घरी असलेली छोटी डायरी पोलिसांच्या हाती लागली आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

या डायरीबाबत फक्त सुनिता यांच्या मुलीलाच माहिती होती. दहा पानी डायरीमध्ये त्यांनी आपल्या पतीचे अनैतिक संबंध असल्याचं नमूद केलं होतं.

मयत शिक्षिका सुनिता, आरोपी पती मनजीत आणि मॉडेल एंजल गुप्ता

'ती मुलगी खूप वाईट आहे. तिने माझ्या आयुष्याची वाताहत केली. माझा नवराही माझं ऐकत नाही. आता माझं मन लागत नाही. तिच्या नादाला लागून तो मला घटस्फोट देण्याच्या बाता करतो. एकदा तर त्याने माझा जीव घेण्याची भाषा केली. समजत नाही काय करु. ही डायरी कोणीही वाचू नका' असं त्यांनी डायरीत लिहिलेलं.

पोलिसांनी पती मनजीतचे कॉल रेकॉर्ड तपासून पाहिले. तेव्हा मॉडेल एंजल गुप्ताचं नाव समोर आलं. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.