नवी दिल्ली : संसदेचं कॅन्टीन पुन्हा एकदा वादात सापडलं आहे. कारण संसदेच्या कॅन्टीनमधल्या जेवणात कोळी सापडला. श्रीनिवासन या अधिकाऱ्याने संसदेच्या कॅन्टीनमधून जेवनाची ऑर्डर दिली होती. त्यामध्ये या अधिकाऱ्याला कोळी सापडलाय.


या प्रकारानंतर अधिकाऱ्याची तब्येतही बिघडली आहे. काल दुपारी ही बाब समोर आली. श्रीनिवासन यांनी संसदेच्या कॅन्टीनमधून पोंगल आणि दही भाताची ऑर्डर दिली होती. हे पदार्थ खात असताना श्रीनिवासन यांना जेवणात कोळी सापडला.

संसदेच्या कॅन्टीनमध्ये दोन वर्षांपूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांसोबत जेवण केलं होतं. त्यामुळे ज्या कॅन्टीनमध्ये खासदारांसह पंतप्रधान जेवण करतात, त्याच कॅन्टीनमध्ये किडा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

कमी पैशात चांगल्या पदार्थांसाठी संसदेची कॅन्टीन ओळखली जाते. कॅन्टीनच्या जेवणावर सबसिडी मिळत असल्याने खाद्यपदार्थांचे दर कमी असतात. मात्र या प्रकारामुळे कॅन्टीनच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.