Delhi Seemapuri IED Case Update : दिल्ली येथील गाझीपूर आणि जुनी सीमापुरी भागातील घरात सापडलेल्या आयईडी प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास फक्त दिल्लीपूरताच मर्यादित राहिला नाही. तर हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशसोबतही तपासाचा संबंध जोडला जात आहे. या कटात सहभागी असलेले संशयीत आरोपी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
आयईडी प्रकरणाचा तपास केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. दिल्लीतील गाझीपूर येथून जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांचे कनेक्शन हिमाचल प्रदेशमधील कुल्लू येथील कार ब्लास्टशी जुळत आहे. पोलिसांच्या संशयानुसार ही स्फोटके पंजाब सीमेमार्गे भारतातील विविध शहरात पाठवली आहेत. याबरोबरच या स्फोटकांचा ब्लास्ट करण्याची जबाबदारी जम्मू आणि काश्मीर मधील स्लीपर सेल यांना देण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतात अस्तित्वात असलेल्या दशतवादी संघटनांचे स्लीपर सेल आयएसआयच्या इशाऱ्यावर मोठे स्फोट घडवण्याच्या तयारीत आहेत. स्थानिक मदतीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स आणणे शक्य नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आयएसआयच्या या कटाचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश एटीएसच्या पथकाने आज सकाळी सीमापुरी येथील एका घरात राहणाऱ्या संशयीतांबद्दल माहिती मिळवली आहे. या प्रकरणातील संशयीत दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी ते राहत असलेल्या घराशेजारील जवळपास 700 पेक्षा जास्त सीसीटीव्हींचे फुटेज एटीएसने तपाली आहेत. याबरोबरच ज्या घरावर छापा टाकला त्या घरमालकाद्वारे संशयितांचा तपास पोलीस करत आहेत. या घरात चार संशयीत भाडेकरू म्हणून राहत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
दिल्ली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेले आयईडी हे एकाच ठिकाणी जमवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ही आयईडी स्फोटके पाकिस्तानच्या सीमेवर एकत्र करून राजस्थान, पंजाब आणि काश्मीरमार्गे दिल्लीत नेण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. शिवाय सूत्रांचे म्हणणे आहे की, जप्त करण्यात आलेली स्फोटके अत्याधुनिक आयईडी असून ते खाणकामासाठी वापरले जाते. दरम्यान, या कटासाठी मदत करणाऱ्या स्थानिक लोकांची ओळख पटवण्याचे काम दिल्ली पोलीस करत आहेत. याबरोबरच उत्तर प्रदेशमधील घरमालकाच्या मदतीने फरार झालेल्या चार संशयित दहशतवाद्यांची छायाचित्रे मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Suspicious Bag Found: राजधानीत घातपाताचा कट उधळला, संशयस्पद बॅगमध्ये आढळले IED, एनएसजीकडून तपास सुरु
- मातोश्रीमधील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा ट्वीटमधून गौप्यस्फोट
- श्रीकांत मेहनती, देईल ती जबाबदारी पार पाडतो; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर केलं श्रीकांत शिंदेंच्या कामाचं कौतुक