Indigo Update: इंडिगो (IndiGo) एअरलाइन्सच्या मालकीची कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनचे (InterGlobe Aviation Limited) सह-संस्थापक राकेश गंगवाल (Rakesh Gangwal) यांनी तात्काळ प्रभावानं संचालक पदाचा राजीनामा दिलाय. सहसंस्थापक राहुल भाटिया (Rahul Bhatia) यांच्यासोबत सुरू असलेल्या वादामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जातंय. मात्र, राजीनाम्या मागचं मुख्य कारण अद्याप समोर आलं नाही. 


इंडिगो बोर्डाला लिहलेल्या पत्रात गंगवाल यांनी म्हटलंय की, पुढील पाच वर्षांमध्ये त्यांचा इंटरग्लोबमधील हिस्सेदारी हळूहळू विकण्याची इच्छा व्यक्त केलीय. एव्हिएशन दिग्गज गंगवाल यांच्याकडे इंटरग्लोबमध्ये 14.65 टक्के आणि त्यांच्या पत्नी शोभा गंगवाल यांच्याकडे 8.39 टक्के भागेदारी आहे. "नवीन गुंतवणूकदारांना कंपनीच्या शेअरच्या किमतीतील संभाव्य वाढीचा फायदा मिळायला हवा, पण माझ्या स्टेकमध्ये हळूहळू घट केल्याने मला काही फायदा मिळू शकेल", असंही गंगवाल यांनी निवेदनात म्हटलंय. 


महत्वाचे म्हणजे, राकेश गंगवाल आणि राहुल भाटिया यांच्यात दिर्घकाळापासून वाद सुरु असल्याची चर्चा आहे. कंपनी चालवण्यावरून दोघांमध्ये वाद असल्याच समजत आहे. इंडिगोनं या महिन्याच्या सुरुवातीला राहुल भाटीया व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 


सध्याच्या मूल्यांकनानुसार, इंडिगोमधील गंगवालच्या भागेदारीचं मूल्य सुमारे 28 हजार कोटी रुपये आहे. जर एखाद्या परदेशी गुंतवणूकदाराला भारतीय विमान वाहतूक बाजारात प्रवेश करायचा असेल, तर निःसंशयपणे इंडिगो ही त्याची पहिली पसंती असेल. अशा परिस्थितीत, गंगवाल त्याच्या स्टेकवर प्रीमियम मिळवू शकतात.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha