Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. यावरुन राणे कुटुंबाकडून शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. स्वत: नारायण राणे यांनी ट्विट करत शिवसेनेच्या नेत्यांच्या घरी ईडीची धाड पडणार असल्याचा इशारा दिला आहे.


तसेच सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्याविषयी ट्विटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यांच्या आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु होणार आहे. नारायण राणे यांनी ट्विटमध्ये सुशांतसिंह आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. तसेच दिशा सालियनवर सामुहिक बलात्कार झाल्याचा आरोपही राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे.  मातोश्रीमधील चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. हे ट्विट राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासाठी ‘महत्वाची बातमी’ असे म्हणत केलं आहे. तसेच ईडीची नोटीस आल्यावर विनायक राऊत आपले  “बॉस ” आणि आपण कुठे धावणार ? असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला आहे.






एकीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे आणि रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपचे किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या बीएमसी निवडणुकीपूर्वी मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार असून बंगल्याची तपासणी करण्यासाठी महापालिकेनं नोटीस पाठवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे वाद रंगण्याची शक्यता आहे. यावरुन आता राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार ? असा इशारा राणे यांनी दिला आहे. 



नारायण राणे विरुद्ध मिलिंद नार्वेकर ट्विटर वॉर –
खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यातील ट्वीटरवरील खडाजंगी चर्चेचा विषय झाला होता. बुधवारी नारायण राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूर्वी  नार्वेकर हे मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे  असे म्हणाले होते. यावर नार्वेकर यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले होते. बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?, असे ट्वीट नार्वेकर यांनी करत नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले होते. नार्वेकरांच्या या ट्वीटला उत्तर देताना नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचा विषय काढला होता.  नारायण राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले होते की,  सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अशा किती घटना मी आपणांस सांगू ? मला बोलायला लावू नका.