Monkeypox Cases in Delhi : राजधानी दिल्लीमध्ये 31 वर्षीय महिलेला मंकीपॉक्स विषाणूची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला नायझेरिया येथील आहे. दिल्लीमधील हा मंकीपॉक्सचा चौथा रुग्ण आहे. तसेच देशात मंकिपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या नऊवर पोहचली आहे. तर देशात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं समोर आले आहे. 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्सबाधित महिलेला लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या महिलेला ताप आणि हातावर पुरळं आहेत. 31 वर्षीय महिलेचे नमुणे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. बुधवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या महिलेची नुकतीच कोणताही विदेश दौरा झालेला नाही.


देशात आतापर्यंत 9 जणांना मंकीपॉक्स विषाणूची लागण झालेली आहे. यामध्ये राजधानी दिल्लीमध्ये आतापर्यंत चार रुग्ण आढळले आहेत. तर पाच रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. दिल्ली आणि केरळमधील एका एका रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  


केंद्र सरकारने देशातील मंकीपॉक्सचा संसर्ग आणि परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे. या समितीमध्ये आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने आता नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने विविध लस निर्मिती कंपन्यांना मंकीपॉक्स विरोधी लस तयार करण्याचं आवाहन केलं आहे.


केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी -
मंकीपॉक्स विषाणूचा वाढता धोका पाहता, केंद्र सरकारने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. याआधीचं केंद्र सरकारकडून सर्व राज्यांच्या सरकारला मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  


काय करावं?


मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाच्या किंवा मंकीपॉक्ससदृश्य लक्षणं आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहू नये.
मंकीपॉक्स संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहिल्यास मास्क आणि सर्जिकल हँड ग्लव्हजचा वापर करावा.
हात स्वच्छ ठेवावेत. साबण किंवा हँड सॅनिटायझरचा वापर करुन हात साफ ठेवावेत.
तुम्हाला मंकीपॉक्सची लक्षणं आढळल्यास आयसोलेशनमध्ये राहून आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा.

काय करु नये?


मंकीपॉक्स संक्रमित किंवा मंकीपॉक्ससदृश्य लक्षणं आढळलेल्या व्यक्तीचे कपडे वापरू नये.
मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीच्या कपड्यांसोबत तुमचे कपडे धुवू नका.
मंकीपॉक्स संक्रमित व्यक्तीसोबत लैंगिक संबंध टाळा.
मंकीपॉक्स संक्रमित किंवा मंकीपॉक्ससदृश्य लक्षणं आढळलेल्या व्यक्तीची भांडी वापरू नये.
चुकीच्या माहितीच्या आधारे कुणालाही घाबरवू नये.
मंकीपॉक्सची लक्षणं काय? 
तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.