Airtel 5G : भारताची आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल ऑगस्ट 2022 मध्ये 5G सेवा सुरु करणार आहे. त्यासाठी एअरटेल कंपनीने एरिक्सन, नोकिया, सॅमसंगसोबत आज करार केला. त्याअंतर्गत या महिन्यात उपकरणांची तैनाती सुरू केली जाणार आहे. नुकताच 5G चा झालेला लिलावात एअरटेलने बाजी मारली होती.  भारती एअरटेलने 43,084 कोटी रुपयांची स्पेक्ट्रम खरेदी केली होती.  सुनील मित्तल यांच्या नेतृत्वातील कंपनीने नुकतेच 900 मेगाहर्ट्ज, 1800 मेगाहर्ट्ज, 2100 मेगाहर्ट्ज, 3300 मेगाहर्ट्ज आणि 26 गीगाहर्ट्ज बँडमध्ये 19,867.8 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम मिळवले आहे. 


एअरटेलची यशस्वी टेस्टिंग -  
5G तंत्रज्ञानाच्या दिशेने भारत वेगाने वाटचाल करत आहे. भारतात 5G तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी झाली आहे. आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने (Bharti Airtel) हैदराबादमध्ये 5G तंत्रक्षानाची यशस्वी चाचणी केली होती. 5G तंत्रज्ञानाच्या चाचणीदरम्यान हैदराबादमध्ये 1 जीबी फाईल अवघ्या 30 सेकंदात डाऊनलोड झाली. त्याशिवाय, एअरटेलने नोकिया (Nokia) सोबत कोलकाता शहराबाहेर 700 MHz स्पेक्ट्रम बँडमध्ये पहिली 5G चाचणी यशस्वीपणे पार पाडली. भारतातील ग्रामीण भागात करण्यात आलेली ही पहिली 5G चाचणी होती. 


दहा पटीने इंटरनेट स्पीड - 
भारतात 5G तंत्रज्ञानाची सुरुवात झाल्यानंतर दहा पटीने इंटरनेटचा स्पीड जास्त वाढेल. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्यांचं आयुष्य बदलून जाईल. सध्या असलेल्या 4G इंटरनेटचा स्पीड इतका चांगलाय. विचार करा 5G तंत्रज्ञानात इंटरनेटचा स्पीड किती असेल. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 5G चा स्पीड हा 4G च्या तुलनेत दहा पटीने जास्त असेल. 5G तंत्रज्ञानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक रोजगार उपलब्ध होतील. ऑटोमेशन वाढेल. आतापर्यंत फक्त मोठ्या शहरांपर्यंत मर्यादीत असणाऱ्या गोष्टी गाव-खेड्यातही उपलब्ध होतील. ज्यामध्ये ई-मेडिसीन, शिक्षण या क्षेत्रांचा समावेश असेल. त्याशिवाय 5G तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होईल.  5G तंत्रज्ञानामुळे डिजिटल क्रांतीला नवी दिशा मिळणार आहे. त्याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्स, उद्योग आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानातही मोठे बदल होणार आहेत. 5G तंत्रज्ञानामुळे नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल. तसेच ई-गवर्नेंसचाही विस्तार होईल.  5G तंत्रज्ञानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. ई-कॉमर्स, आरोग्य केंद्र, दुकानदार, शाळा, महाविद्यलय, कॉलेज, इतकेच नाही तर शेतकरीही याचा फायदा घेतील.  कोरोना महामारीच्या काळात आपण सगळे जवळपास इंटरनेटवरच अवलंबून होतो, हे पाहाता आपण इंटरनेटवर खूप निर्भर असल्याचं दिसतेय. हे सर्व पाहाता 5G आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 5G तंत्रज्ञानामुळे  हेल्थकेअर, व्हर्चुअल रियालिटी, क्लाउड गेमिंग यासाठी नवीन रस्ते खुले होतील. तसेच विनाचालक गाडी सुरु होण्याच्या दिशेनेही पावले उचलली जातील.